![]()
वैजापूर तालुक्यातील पालखेड येथे मंगळवारी संत शिरोमणी सावता महाराज यांचा ७३१ वा संजीवनी समाधी सोहळा भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडला. रविकांत महाराज वसेकर (संत सावता महाराज वंशज) यांच्या प्रेरणेने पालखेड येथील भगवान पारेश्वर मंदिरात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्यानिमित्त ज्ञानेश्वर महाराज बेलदारवाडीकर यांच्या कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले. महाराजांनी संत तुकाराम महाराजांच्या “धन्य ते संसारीं, दयावंत जे अंतरीं!, मधुरा वाणी होटीं, तुका म्हणे वाव पोटी !! या अभंगावर निरुपण करत भाविकांना मार्गदर्शन केले. समाधी सोहळ्यानिमित्त सकाळी ग्रामस्थ व माळी समाज बांधवांच्या वतीने संत सावता महाराजांच्या मूर्तीस पंचामृत अभिषेक घालून महापूजा करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी महंत महेंद्रगिरी महाराज, हरीनाथ महाराज ढगारे, पांडुरंग महाराज पवार, रावसाहेब महाराज पठाडे, साईनाथ महाराज सोनवणे, कुणाल महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संत सावता महाराज नवतरुण मित्र मंडळ, पालखेड येथील भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. संतांच्या मुखात नेहमी मधुर वाणी, इतरांचे दोष पोटात घेण्याइतके हृदय असते कीर्तनात बोलताना महाराज म्हणाले की, संतांचा जन्म मुळातच लोकांच्या आणि जगाच्या कल्याणासाठी झालेला असतो. ज्यांच्या अंतःकरणात भूतदया आहे, तेच या संसारात खऱ्या अर्थाने धन्य आहेत. संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे, संतांच्या मुखात नेहमी गोड व मधुर वाणी असते आणि इतरांचे दोष पोटात घेण्याइतके विशाल हृदय त्यांच्यापाशी असते. प्रत्येकाने जीवनात आई-वडीलांची सेवा करावी, असा संदेशही त्यांनी यावेळी दिला. कीर्तनासाठी पालखेडसह परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. यशस्वितेसाठी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
Source link
संतांचा जन्म लोकांच्या कल्याणासाठीच झाला- ज्ञानेश्वर महाराज बेलदारवाडीकर:पालखेड येथे संत सावता महाराज संजीवनी समाधी सोहळा उत्साहात