![]()
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत मुंबईकडे प्रस्थान करण्याची घोषणा केली आहे. 15 सप्टेंबरला ते आंतरवालीतून निघणार असून आझाद मैदानात उपोषण करणार आहेत. त्यांच्या या घोषणेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, आता भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी यावर सावध आणि सूचक प्रतिक्रिया दिली आहे. सध्या गणेशोत्सवाचे दिवस असल्याने सणासुदीच्या काळात आंदोलन करणे कोणत्याही अर्थाने संयुक्तिक ठरणार नाही, असा सल्ला दरेकर यांनी जरांगे पाटील यांना दिला आहे. ‘पोलिसांवरील ताणाचे भान राखावे’ मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, “सध्या सणासुदीचे दिवस आहेत. लोक सण आणि उत्सव साजरे करण्यात मग्न आहेत. अशा आनंदाच्या वातावरणात आपल्या कोणत्याही आंदोलनामुळे सणासुदीचे वातावरण खराब होऊ नये किंवा त्याला गालबोट लागू नये. सणांच्या काळात मुंबई पोलिसांवर बंदोबस्ताचा मोठा ताण असतो, याचे भान आंदोलकांनी राखले पाहिजे.” ‘शिवभक्त म्हणून सणांत विघ्न येऊ देऊ नका’ दरेकर यांनी पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ देत जरांगे पाटील यांना आवाहन केले. ते म्हणाले, “आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहोत. त्यामुळे हिंदूंचे सण, उत्सव आणि परंपरा यांच्यामध्ये महाराजांचे शिवभक्त आणि पाईक म्हणून कोणताही व्यत्यय येणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे.” सणासुदीच्या या काळात लोकांची गैरसोय होऊ नये आणि उत्सवाचा आनंद कायम राहावा, अशीच सर्वांची अपेक्षा असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. ———– ही बातमी पण वाचा.. जरांगेंच्या उपोषणाचा 16वा दिवस:जेलमध्ये टाकले तरी आता माघार नाही, 15 सप्टेंबरला मराठे मुंबईत धडकणारच; शिवराळ भाषेच्या आरोपांवर जरांगेंचे प्रत्युत्तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 15 सप्टेंबरपासून ‘मुंबई चलो’ आंदोलनाची हाक देणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. सरकारला गोरगरिबांची अजिबात कदर नाही. आम्ही सरकारला तब्बल 3 वर्षे संधी दिली. आता काय व्हायचे ते मुंबईतच होणार, आम्हाला जेलमध्ये टाकले तरी चालेल, पण हे आंदोलन आता थांबणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. सविस्तर वाचा
Source link
सणासुदीच्या काळात आंदोलन करणं संयुक्तिक नाही:पोलिसांवरील ताणाचं भान राखावं; प्रवीण दरेकरांचे जरांगेंना आवाहन