![]()
सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या मुद्द्यावरून विधानसभेत बुधवारी चांगलाच गदारोळ झाला. ‘महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध (सुधारणा) विधेयक 2026’वर चर्चा सुरू असताना भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारच्या धोरणावर जोरदार हल्ला चढवला. या वादावर प्रतिक्रिया देताना मंत्री आशिष शेलार यांनी, तुमचा सूड घेणारा अजून महाराष्ट्रात जन्माला यायचा आहे, अशा शब्दांत विरोधकांना आणि सूड घेण्याच्या प्रवृत्तीला खणखणीत उत्तर दिले. शेलारांच्या या विधानामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते. ‘आम्हाला शिक्षा करता, मग कर्मचाऱ्यांची काय चूक?’ सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासकीय बदल्यांच्या प्रक्रियेवर बोट ठेवताना सरकारला घेरले. चांगले काम करणाऱ्यांवर अन्याय करण्याची नवीन पद्धत विकसित केली जात आहे, अशी टीका त्यांनी केली. जनगणनेसारख्या महत्त्वाच्या कामात अहोरात्र कष्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडताना त्यांनी सरकारला थेट सवाल केला की, आता आमचा सूड घ्या, पण त्या बिचाऱ्या कर्मचाऱ्यांचा कशाला घेता? कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा विचार करता, त्यांना दिलासा देण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत वाढवण्याची आग्रही मागणी त्यांनी लावून धरली. सूडाचे राजकारण खपवून घेणार नाही- शेलार मुनगंटीवारांच्या या आक्रमक भूमिकेनंतर मंत्री आशिष शेलार यांनी सूडबुद्धीच्या राजकारणाचा निषेध केला.कोणीही कोणाचा सूड घेऊ नये,असे स्पष्ट करत, शेलार यांनी, तुमचा सूड घेणारा अजून महाराष्ट्रात जन्माला यायचा आहे, त्यामुळे असा विषयच उद्भवत नाही, असे ठणकावून सांगितले. सरकारने कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी भूमिका घेत शेलारांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला
Source link
सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवरून विधानसभेत घमासान:बदल्यांच्या मुद्द्यावरून मुनगंटीवार आक्रमक; आशिष शेलारांनी 'सूडाच्या राजकारणा'वरून ठणकावले