![]()
नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त (CP) विश्वास नांगरे पाटील हे त्यांच्या एका कार्यक्रमातील उपस्थितीमुळे आणि विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि संस्थापकांची स्तुती केली. यावरून काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत “ते संविधानाची आणि खाकी वर्दीची शपथ विसरून संघाची चाटुगिरी करत आहेत,” अशी घणाघाती टीका केली आहे. एकीकडे काँग्रेसने नांगरे पाटलांना टार्गेट केले असताना, दुसरीकडे नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र त्यांचे स्वागत करत नागपूरच्या सुधारलेल्या कायदा व सुव्यवस्थेचे कौतुक केले आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील नेमके काय म्हणाले? नागपूर शहर पोलीस आयुक्तपदाची सूत्रे त्यांनी नुकतीच हाती घेतली ओहत. विश्वास नांगरे पाटील यांनी संघाच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, “माझी हिंदी थोडी कच्ची आहे (ब्रोकन हिंदी), पण जीवनात शिस्त असणाऱ्या स्वयंसेवकांचे हे संघटन आहे. 1925 मध्ये एका दूरदर्शी राष्ट्रभक्ताने, म्हणजेच डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.” अशा शब्दांत त्यांनी संघाचे आणि स्वयंसेवकांचे जाहीर कौतुक केले. काँग्रेसचा संताप- “हा लोकशाही आणि संविधानाचा अपमान” नांगरे पाटलांच्या या भाषणानंतर काँग्रेसने अधिकृत ‘एक्स’ (ट्विटर) खात्यावरून त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘राग दरबारी गाण्या, संघाच्या दारी हजर झाले!’ असा टोला लगावत काँग्रेसने गंभीर आरोप केले आहेत. “एका बाजूला भारतीय संविधानाची शपथ घेऊन जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी अंगावर घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला दिवसाढवळ्या समाजात द्वेष पसरवणाऱ्या संघाची जाहीर स्तुती करायची… हे कसले कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी? शासकीय सेवेत असताना एका विशिष्ट विचारसरणीची आणि द्वेष पसरवणाऱ्या संघटनेची चाटूगिरी करणे म्हणजे लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान आहे.” “आता या महाशयांची बदली नागपूरला झाली आहे. बरं झालं, ज्यांची सेवा करायची आहे, आता थेट त्यांच्याच चरणी जाऊन सेवा करण्याची संधी यांना मिळाली आहे.” काँग्रेसने कडक इशारा देत म्हटले की, “तुम्ही जनतेच्या पैशावर पगार घेणारे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शपथ घेतलेले सरकारी नोकर आहात, देशद्रोही संघाचे स्वयंसेवक नाही. वर्दीचा गैरवापर करून जर राजकीय आणि धार्मिक अजेंडा राबवणार असाल, तर नागपूर आणि महाराष्ट्राची संविधानप्रेमी जनता हे खपवून घेणार नाही!” चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्वागत आणि ‘सक्षम नागपूर’चा दावा एकीकडे काँग्रेसने नांगरे पाटलांच्या नियुक्ती आणि कृतीवर आक्षेप घेतला असताना, राज्याचे नेते आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे नागपुरात स्वागत केले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “श्री. विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो व आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो.” बुधवारी केलेल्या एका ट्विटमध्ये बावनकुळे यांनी नागपूर ग्रामीण पोलिसांच्या कामगिरीचेही कौतुक केले. जानेवारी ते मे 2026 या कालावधीत मागील वर्षीच्या तुलनेत नागपूरमध्ये गुन्हेगारीत मोठी घट झाल्याची आकडेवारी त्यांनी मांडली. खुनाच्या घटनांमध्ये 54.55% घट, चोरीच्या घटनांमध्ये 29% घट, मारहाणीच्या घटनांमध्ये 25.33% घट आणि विनयभंगाच्या घटनांमध्ये 20% घट असल्याचे त्यांनी म्हटले. ही घट मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सक्षम कायदा व सुव्यवस्थेची साक्ष असल्याचे सांगत बावनकुळेंनी नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आणि “सुरक्षित नागपूर… सक्षम नागपूर!” असा नारा दिला. नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याने तेथील पोलीस आयुक्तांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे नेहमीच लक्ष असते. विश्वास नांगरे पाटील यांच्या संघावरील स्तुतिसुमनांमुळे आता नागपुरात काँग्रेस विरुद्ध भाजप असा नवा राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.
Source link
'वर्दीची शपथ विसरून संघाची स्तुती…':संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांवर काँग्रेसची टीका