Headlines

सरकार नावाच्या भिंतीवर डोकं फोडावं, सदाभाऊ खोतांचा संताप:शेणा-मुतात हात घालू नका; गोवंश कायद्यावरून घणाघात




गोवंश हत्या बंदी कायद्याच्या अंमलबजावणीवरून आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. पंढरपूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल केला. आता सरकार नावाच्या भिंतीवर डोकं फोडावं असं वाटतंय. कदाचित त्यानंतर तरी सरकारला अक्कल येईल, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या जनावरांवर होत असलेल्या कारवाईमुळे ग्रामीण भागात भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचंही त्यांनी सांगितलं. सदाभाऊ खोत यांनी सांगितले की, ते 350 किलोमीटरचा प्रवास करून थेट पंढरपूरमध्ये आले. कारण शेतकऱ्यांची जनावरं पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. माझा शेतकरी भोळा आहे. तो शेतीसाठी बैल खरेदी करतो, पण आता त्याची जनावरं जप्त करून कैद केली जात आहेत. हा अन्याय आहे, असं ते म्हणाले. गोवंश बंदी कायद्याच्या काही तरतुदींमुळे प्रत्यक्ष शेतकरीच अडचणीत सापडत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पंढरपूरमध्ये गोरक्षकांनी पकडलेल्या जनावरांची पाहणी करताना सदाभाऊ खोत अधिक आक्रमक झाले. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांची जनावरं तुरुंगात गेली आहेत, असा दावा त्यांनी केला. जून महिन्यात पेरणी हंगाम सुरू होतो, त्याआधी मे महिन्यात शेतकरी शेतीची मशागत आणि तयारी करत असतो. त्यासाठी विविध बाजारातून बैल खरेदी करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. बीड जिल्ह्यातून सांगोला तालुक्यात आणलेल्या बैलांवर कारवाई झाल्याने शेतकरी चिंतेत असल्याचं त्यांनी नमूद केलं. सरकारवर टीका करताना सदाभाऊ खोत यांनी जातीय राजकारणाचाही मुद्दा उपस्थित केला. हिंदुस्थानात सत्ता जातीपातीतून मिळते, मातीतून नाही. सरकारला शेतकऱ्यांची मतं नकोत, त्यांना फक्त जातीपातीची मतं हवी आहेत, असा आरोप त्यांनी केला. सरकारने शेतकऱ्यांच्या पारंपरिक व्यवहारात हस्तक्षेप करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. शेणा-मुतात हात घालू नका, असा थेट दम त्यांनी सरकारला भरला. गोवंश बंदी कायद्याच्या अंमलबजावणीवरून राजकारण तापण्याची शक्यता पशुपालन आणि जनावरांची खरेदी-विक्री हा हजारो वर्षांपासून सुरू असलेला व्यवसाय असल्याचं सांगत सदाभाऊ खोत यांनी सरकारने वेगळ्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं, असा सल्ला दिला. दारू, गुटखा, अफू यांसारख्या गंभीर गोष्टींकडे सरकारने लक्ष द्यायला हवं. मात्र, त्याऐवजी शेतकऱ्यांच्या जनावरांवर कारवाई केली जात आहे, असा टोला त्यांनी लगावला. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे गोवंश बंदी कायद्याच्या अंमलबजावणीवरून आता राज्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *