Headlines

सर्वांनीच EV वापरली तर भारनियमन वाढेल:रोहिणी खडसेंनी व्यक्त केली वेगळीच चिंता; मंत्र्यांच्या धडाधड EV खरेदीवर सोडले वाग्बाण




राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी मंत्र्यांकडून धडाधड खरेदी करण्यात येणाऱ्या ईव्ही कारवर उपरोधिक टिप्पणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सर्वच मंत्री – संत्री नव्या कोऱ्या ईव्ही कार खरेदी करत आहेत. सर्वांनीच ईव्ही वापरण्यास सुरूवात केली, तर काही दिवसांत राज्यातील 7 तासांचे लोडशेडिंग 15-16 तासांवर पोहोचेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. इराण – अमेरिका युद्धामुळे देशात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी उपाय म्हणून जनतेला पेट्रोल – डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत राज्यातील अनेक मंत्र्यांनी विजेवर चालणाऱ्या कारची (ईव्ही) खरेदी सुरू केली आहे. तसेच ते जनतेलाही ईव्ही कार खरेदी करण्याचे आवाहन करत आहेत. या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी सर्वांनीच ईव्ही वाहने चालवणे सुरू केली, तर राज्यावर भारनियमनाचे संकट ओढावेल अशी भीती व्यक्त केली आहे. 8 तासांचे लोडशेडींग 15-16 तासांवर पोहोचेल – रोहिणी खडसे रोहिणी खडसे म्हणाल्या, जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. तेव्हापासून आपल्या राज्यातील मंत्री-संत्री नव्या कोऱ्या EV Car घेत सुटलेत. लोकांना हे एकाप्रकारे ईव्ही कार घेण्याचे आवाहन करत आहेत. आज पावसाळा तोंडावर आहे, पेरणीचे दिवस सुरू झालेत. या अत्यंत गरजेच्या काळात माझ्या शेतकऱ्याला आठ-आठ तास लोडशेडींगचा त्रास सहन करावा लागतोय. त्याला वेळेत वीज मिळत नाहीये. याचा विचार सत्ताधारी करणार आहेत का ? या मंत्र्या-संत्र्यांना काय आहे ? यांना तर कुठंही वीज उपलब्ध होईल, हे बेसुमार वीज वापरतील. पण हा खड्डा माझ्या शेतकऱ्यांच्या सोसावा लागेल ना ! सगळ्यांनीच जर ईव्ही कार वापरायला सुरुवात केली तर काही दिवसांनी राज्यात विजेचाही तुटवडा जाणवेल आणि आता 8 तास असणारे लोडशेडींग उद्या 15-16 तासांवर पोहोचेल. जरा भान ठेवून वागा, माझ्या शेतकऱ्यांचा जरा विचार करा! सगळ्याच गोष्टी काय पीआर आणि मार्केटिंगसाठी कसे करता?, असे त्यांनी म्हटले आहे. राज्यातील बहुतांश मंत्र्यांचे ईव्हीला प्राधान्य पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करून स्वतःही ईव्हीचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रवासासाठी ईव्ही कारला प्राधान्य दिले आहे. मंत्री उदय सामंत यांनीही आपल्या संपूर्ण ताफ्यात ईव्ही कारचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री नीलेश राणे यांनीही ईव्ही कार खरेदी करत पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *