![]()
नेप्ती येथील चांदपीर वस्ती जामगाव नाला-सीना नदीपात्रात करण्यात आलेले कथित अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे, तसेच नदीपात्रात टाकलेली भर आणि अनधिकृत पूल (बंधारा) काढण्यात यावा या मागणीसाठी नेप्ती ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी ९ वाजता छत्रपती कॉलेज परिसरात आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको आंदोलन केले. पावसाळा तोंडावर असताना प्रशासनाच्या ढिम्म कारभाराविरोधात ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. ग्रामस्थांनी यापूर्वी तहसील कार्यालयाला दिलेल्या निवेदनात चांदपीर वस्ती परिसरातील सीना नदीवर काही व्यक्तींनी नदीपात्रात अतिक्रमण करून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवल्याचा आरोप केला होता. पावसाळ्यात नदीला पूर आल्यास शेजारील शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली होती. मात्र, प्रशासनाकडून वेळेत दखल न घेतली गेल्याने ग्रामस्थांना रस्त्यावर उतरावे लागले. या आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण होळकर, ग्रामपंचायत सदस्य विजय होळकर, माजी सरपंच संजय आसारामजपकर, शिवा होळकर, प्रताप कळसे सहभागी झाले होते. या संदर्भात नेप्ती येथील मंडळ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला असता धक्कादायक बाब समोर आली आहे. जामगाव नाल्याच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या प्रवाहाच्या उत्तर बाजूस गट क्रमांक २९५ लगत नदीपात्रात माती व रॅबिट वापरून सुमारे १६० ब्रासची भर टाकण्यात आल्याचे आढळून आले आहे. संबंधित अनधिकृत पुलाच्या बांधकामामुळे सीना नदीचा नैसर्गिक प्रवाह धोक्यात आला आहे. पावसाळा सुरू झाला असून कधीही पूर येऊ शकतो. त्यामुळे दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने हे अनधिकृत बांधकाम तात्काळ पाडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. तहसीलदार अभिजीत वांढेकर यांनी स्वतः आंदोलनस्थळी धाव घेतली. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून, “भूमी अभिलेख विभागामार्फत आठ दिवसांच्या आत मोजणी पूर्ण केली जाईल. तसेच नियमांनुसार अतिक्रमणावर कारवाई करून नदीपात्र मोकळे केले जाईल, असे लेखी आश्वासन दिले. प्रशासनाच्या या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले.
Source link
सीना नदीपात्रातील अतिक्रमणाविरोधात नेप्ती ग्रामस्थ आक्रमक:रास्ता रोको आंदोलन, 8 दिवसांत मोजणीचेप्रशासनाचे आश्वासन