![]()
नैसर्गिक व सेंद्रीय पद्धतीने शेती करुनसुद्धा कधीही तोटा न होऊ देणाऱ्या जिल्ह्यातील २० गुणी शेतकऱ्यांचा मंगळवारी जाहीर सत्कार करण्यात आला. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला.
.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अर्चना निस्ताने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी, कृषी विकास अधिकारी मल्ला तोडकर, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी प्रशांत नाईक, उपविभागीय कृषी अधिकारी पंकज शेडे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत गुल्हाने, उत्कर्ष भोसले, गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे, शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्रा. जितेंद्र दुर्गे उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्याच्या १४ तालुक्यांमधील प्रत्येकी एका प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्याला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, रोपटे व सन्मानचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले. यामध्ये चांदूर बाजारचे पुष्पक खापरे, चिखलदऱ्याचे रिंगा जांभेकर, चांदूर रेल्वेच्या ममता ठाकूर, अंजनगाव सुर्जीचे बाळकृष्ण सहारे, धामणगाव रेल्वेचे राहुल बांबल, अमरावतीचे मनोज इंगोले, तिवस्याचे सुरज गिरी, अचलपूरचे शरद बोंडे, भातकुलीचे विकास सावरकर, नांदगाव खंडेश्वरचे राजेश खेडकर, दर्यापुरचे विजय लासुरकर, धारणीचे सुखराम धुर्वे, मोर्शीचे ललितकुमार ढेवले आणि वरूडचे आशिष गुडधे यांचा समावेश आहे. याशिवाय वेगळ्या पद्धतीने शेती करणाऱ्या इतर सहा शेतकऱ्यांचाही यावेळी जाहीर सत्कार करण्यात आला. अशाप्रकारे एकूण २० शेतकऱ्यांच्या पाठिवर सर्वांनी कौतुकाची थाप दिली.
प्रा. जितेंद्र दुर्गे यांनी यावेळी सेंद्रिय शेतीचे महत्त्व, रासायनिक खतांच्या दुष्परिणामांवर मात करण्यासाठी नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचा स्वीकार करण्याची आवश्यकता यावर मार्गदर्शन केले, तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अर्चना निस्ताने यांनी एल-निनोच्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना राबविण्याची गरज अधोरेखित केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कृषी विकास अधिकारी मल्ला तोडकर यांनी केले. सूत्रसंचालन कृषी अधिकारी पवनकुमार ढोमणे यांनी केले, तर आभार जिल्हा कृषी अधिकारी निलेश राठोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहाय्यक प्रशासन अधिकारी अशोक गावंडे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी कलाने आणि जयेश वरखेडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
ठमके, घोरपडे म्हणतात यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त सीईओ ठमके यांनी रासायनिक शेतीकडून आरोग्यदायी, सेंद्रिय व नैसर्गिक शेतीकडे वाटचाल करण्याचे आवाहन करत, देश समृद्ध करायचा असेल तर शेती समृद्ध करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन केले. तर कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांनी शेती व्यवसायामध्ये उत्पादन खर्च कमी करणे, हे सर्वात मोठे आव्हान आहे. नैसर्गिक व सेंद्रीय शेती करताना नेमक्या याच आव्हानाचा सहज सामना करता येतो. विशेष म्हणजे आपण हे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनीही या पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन केले.