![]()
‘तुला जे हवं ते घे, सोनं घे, पैसे घे, पण माझ्या लेकराला हात लावू नकोस…,’ समृद्धी महामार्गावर शुक्रवारी रात्री दरोडेखोरांसमोर आई विनवणी करत होती… दरोडेखोरांना मात्र पाझर फुटला नाही. त्यांनी त्या कोवळ्या जीवाला थेट सिमेंटच्या रस्त्यावर फेकून दिलं अन् आईनं जिवाच्या आकांतानं गाडीबाहेर झेप घेतली. रडणाऱ्या बाळाला छातीशी कवटाळलं… समृद्धी महामार्गावर सिन्नरजवळ अंधाऱ्या रात्री दरोडेखोरांनी लूट केली अन् संपूर्ण मिश्रा कुटुंबाच्या काळजाचा ठोकाच चुकला. दागिने आणि पैसे गेले याचे दुःख नव्हते; पण पैशांच्या हव्यासापोटी गुंडांनी त्या १९ महिन्यांच्या चिमुकल्याला आईच्या कुशीतून ओरबाडून अंधाऱ्या रस्त्यावर फेकून दिले, तेव्हा हे कुटुंब पार हादरून गेले… छत्रपती संभाजीनगरचे वकील ॲड. श्रीकांत मिश्रा यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना या भयावह रात्रीची आपबीती सांगितली. रात्री सव्वाअकराची वेळ. ११० च्या वेगात असलेली गाडी दरोडेखोरांनी टाकलेल्या रॉडवर आदळली. गाडीचे टायर फुटले. ॲड. मिश्रा गाडीबाहेर उतरताच अंधारातून आलेल्या १२ जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. स्वतःला वाचवण्यासाठी मिश्रा यांनी गाडीचा दरवाजा लावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्या बाजूने आलेल्या गुंडांनी थेट गाडीचा दरवाजा उघडला अन् पत्नीच्या कुशीत असलेल्या १९ महिन्यांच्या ‘अवधूत’ला हिसकावून घेतले. “इसको लेके जायेंगे…,’ हे वाक्य कानावर पडताच त्या आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. … पण माणुसकी हरवली होती हा थरार तब्बल २५ मिनिटे सुरू होता. डोळ्यांसमोर बायको आणि मुलाला लुटले जात होते, पण मिश्रा कुटुंब असहाय होते. या २५ मिनिटांत त्यांच्या गाडीजवळून सुसाट वेगाने शेकडो, हजारो गाड्या मुंबईच्या दिशेने गेल्या. गाडीभोवती तोंडाला रुमाल बांधलेले १२ लोक उभे आहेत, एक कुटुंब संकटात आहे, हे पाहून एकाही गाडीने आपला वेग कमी केला नाही. दरोडेखोर पसार झाल्यानंतर, फुटलेल्या टायरवरच अर्धा किलोमीटर गाडी चालवत नेत मिश्रा कुटुंबाने मदत मिळवली. पायातील वाळाही ओरबाडला दरोडेखोरांनी ॲड. मिश्रा आणि त्यांच्या पत्नीच्या अंगावरील दागिने ओरबाडले. पत्नीने स्वतःहून ‘कानातले काढून देते,’ असे सांगूनही त्यांनी ते कानातून ओढून काढले. इतकेच नव्हे, तर रस्त्यावर फेकलेल्या बाळाच्या गळ्यातील सोन्याचे ‘ओम’चे पेंडंट आणि पायातील चांदीचा वाळाही त्यांनी काढून घेतला. गाडीत मुलांसाठी खायला ठेवलेली सफरचंदे आणि ड्रॅगन फ्रूट्सही या दरोडेखोरांनी तिथेच उभे राहून फस्त केले.
Source link
‘सोनं-चांदी सगळं घ्या, पण लेकराला सोडून द्या…’:‘समृद्धी’वर दरोडेखोरांनी 19 महिन्यांच्या बाळाला टाकले रस्त्यावर