Headlines

क्रीडा महोत्सव:मैदानी खेळांतून जीवनात शिस्त आणि व्यक्तिमत्वाचा विकास, हॉकी, मल्लखांब ते तलवारबाजी.. प्रात्याक्षिकांनी वेधले लक्ष‎




राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त प्रोफेसर कॉलनी चौक विविध क्रीडा प्रकारांच्या प्रात्यक्षिकांनी अक्षरशः गजबजून गेला. हॉकी, सायकल, मल्लखांब, रायफल शूटिंग, तलवारबाजी, ज्युदो, कुस्ती, बॉक्सिंग, खो-खो आणि बास्केटबॉल अशा विविध खेळांच्या थरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. खेळातून आरोग्य, शिस्त आणि जिद्द निर्माण होते, असा संदेश देत या उपक्रमातून शहरात क्रीडा संस्कृती रुजविण्याचे आवाहन करण्यात आले. खेळामुळे जीवनात शिस्त निर्माण होते. अपयश पचवून पुन्हा प्रयत्न करण्याची आणि यशाची पायरी चढण्याची जिद्द खेळातून निर्माण होते, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर, जिल्हा ऑलिंपिक संघटना, एकविध खेळ संघटना आणि विविध क्रीडा मंडळांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच प्रोफेसर कॉलनी चौकात खेळाडू, प्रशिक्षक, पालक आणि क्रीडाप्रेमी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, नगरसेवक करण कराळे, पुष्कर कुलकर्णी, सतीश शिंदे, मनोज दुल्लम उपस्थित होते. यावेळी अहिल्यानगर जिल्हा हॉकी संघटनेच्यावतीने असिफ शेख यांच्या प्रशिक्षणार्थींनी हॉकी, सायकलिंग संघटनेचे प्रा. संजय साठे व संभाजी मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सायकलिंग, मल्लखांब संघटनेचे नंदेश शिंदे व श्रीरंग कुलकर्णी यांच्या प्रशिक्षणार्थींनी मल्लखांब, प्रियदर्शनी पब्लिक स्कूल भिंगार येथील प्रशिक्षक सुदर्शन कोतकर यांच्या प्रशिक्षणार्थीनी रोलर हॉकी, रायफल शूटिंग संघटनेच्यावतीने ऋषिकेश दरंदले व अलिम शेख यांच्या प्रशिक्षणार्थींनी रायफल व पिस्तूल शूटिंग, तलवारबाजी संघटनेच्यावतीने वैष्णवी गोडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तलवारबाजी, अहिल्यानगर जिल्हा जुदो व कुराश संघटनेच्यावतीने प्रा.संजय धोपावकर व आदित्य धोपावकर यांच्या प्रशिक्षणार्थींनी ज्युदो, जिल्हा कुस्तीगीर संघाच्यावतीने निलेश मदने यांच्या प्रशिक्षणार्थींनी कुस्ती, जिल्हा बॉक्सिंग संघटनेच्यावतीने शकील शेख यांच्या प्रशिक्षणार्थींनी बॉक्सिंग, बाणेश्वर क्रीडा मंडळाच्या गणेश वारुळे व रामेश्वर चेमटे यांच्या प्रशिक्षणार्थींनी खो-खो, बास्केटबॉल जिल्हा संघटनेच्यावतीने सचिन भापकर यांच्या प्रशिक्षणार्थींनी बास्केटबॉलचे प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शैलेश गवळी, विशाल गर्जे, प्रवीण कोंढावळे, संतोष वाबळे, रमेश जगताप आदींनी परिश्रम घेतले. खेळांतून व्यक्तिमत्व विकास, करिअरच्या संधी मनपा आयुक्त डांगे म्हणाले, खेळ केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्यातून व्यक्तिमत्त्व विकास आणि करिअरच्या संधी निर्माण होतात. पालकांनी आपल्या मुलांना मैदानी खेळांसाठी प्रोत्साहित करावे. खेळाडूला अपयशातून पुन्हा उभे राहण्याची ताकद खेळ देतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *