Headlines

हवामानातील बदलामुळे अमरावती जिल्ह्यात मोठा निर्णय:16.85 लाख रेशनकार्डधारकांना एकाचवेळी 3 महिन्यांचे धान्य




हवामानातील बदलांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील १६.८५ लाख रेशनकार्डधारकांना एकाचवेळी तीन महिन्यांचे धान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली आहे. हा एकत्रित धान्यपुरवठा एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी असेल. लाभार्थ्यांनी त्यांच्या सोयीनुसार ३० जूनपर्यंत या धान्याची उचल करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात अंत्योदय योजनेची १ लाख २९ हजार ४६६ रेशन कार्ड्स आहेत, तर प्राधान्य गटाची १५ लाख ५६ हजार १६ कार्ड्स आहेत. या सर्व कार्डधारकांना तीन महिन्यांचे रेशन दिले जाणार आहे. जिल्ह्यात दोन हजारांहून अधिक रेशन दुकानांची साखळी असून, या दुकानांपर्यंत धान्य पोहोचले आहे. अंत्योदय कार्डधारकांना प्रति कार्ड दरमहा २१ किलो गहू आणि चार किलो तांदूळ वितरित केला जाईल. तीन महिन्यांसाठी त्यांना एकूण ६३ किलो गहू आणि १२ किलो तांदूळ मिळेल. प्राधान्य गटातील कार्डधारकांना प्रति व्यक्ती दरमहा ३ किलो गहू आणि दोन किलो तांदूळ दिला जाईल. त्यानुसार, तीन महिन्यांसाठी प्रति व्यक्ती ९ किलो गहू आणि ६ किलो तांदूळ मिळेल. कार्डवरील नावांच्या संख्येनुसार धान्याचे प्रमाण निश्चित केले जाईल. दरम्यान, मेळघाटातील आदिवासी-कोरकू जमातीचे प्रमुख खाद्य तांदळासोबत ज्वारी व मका असल्याने, चिखलदरा आणि धारणी या दोन तालुक्यांतील रेशनकार्डधारकांना गव्हाऐवजी मका दिला जाणार आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी सांगितले की, “शासनाने तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी देण्याचा निर्णय घेतल्यामुळे एप्रिल ते जून २०२६ चे वाटप सुरू झाले आहे. लाभार्थ्यांना या धान्याची उचल ३० जूनपर्यंत करता येईल. संबंधित दुकानदारांनी त्यांच्या पॉस मशीनमध्ये अचूक नोंदी ठेवाव्यात.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *