Headlines

वीटभट्टी मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर:मेळघाटमधील विद्यार्थ्यांचे प्रशासनाला साकडे, आंदोलनाचा इशारा




अमरावती येथील वीटभट्ट्यांवर कामासाठी येणाऱ्या मेळघाटातील मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. ‘खोज’ संस्थेचे संस्थापक ॲड. बंड्या साने, ब्रदर जोस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या मुलांसाठी वीटभट्ट्यांवरच शाळा सुरू करण्याची मागणी केली आहे. कायद्यानुसार, मजुरांच्या मुलांसाठी त्यांच्या कामाच्या ठिकाणीच शाळा सुरू करण्याची तरतूद आहे. मात्र, दरवर्षी या नियमाची अंमलबजावणी होत नाही. मुलांना ना तात्पुरती निवारा शेड, ना शालेय साहित्य, ना शिक्षक उपलब्ध करून दिले जातात. यामुळे वीटभट्ट्यांवर आई-वडिलांसोबत आलेल्या या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी, ‘खोज’ संस्थेच्या प्रतिनिधींनी गेल्या दोन दिवसांपासून विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मेळघाटचे प्रकल्प संचालक आणि आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त यांची भेट घेतली. या भेटींदरम्यान, मजुरांची मुलेही त्यांच्यासोबत उपस्थित होती. मेळघाटातील आदिवासी आणि कोरकू समाजाचे नागरिक प्रामुख्याने मजुरीवर अवलंबून आहेत. उन्हाळ्यात त्यांना त्यांच्या गावात काम मिळत नाही, प्रशासनाकडून मनरेगाची कामे उपलब्ध असल्याचा दावा केला जात असला तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. त्यामुळे नाइलाजाने त्यांना अमरावतीला येऊन वीटभट्ट्यांवर काम करावे लागते. मुलांची काळजी घेण्यासाठी त्यांना आपल्या मुलांनाही सोबत आणावे लागते. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या अभावामुळे वीटभट्ट्यांवर काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी शिक्षणाची सोय वेळेत केली जात नाही. यामुळे दरवर्षी सामाजिक कार्यकर्त्यांना प्रशासनाशी संघर्ष करावा लागतो. यावर्षीही परिस्थिती तीच असल्याने, संबंधित कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांसह अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ‘ठाण मांड’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *