![]()
हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी नगर भागातील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना गुरुवारी ता. १३ पहाटे घडली आहे. मात्र एटीएम मधील ५४ हजार रुपयांची रक्कम सुरक्षित असून घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून दोघांनी मिळून प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजीनगर भागात भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे. आज सकाळच्या सुमारास एटीएम फोडल्याचा प्रकार दिसून आला. या घटनेची माहिती भारतीय स्टेट बँकेसोबतच हिंगोली शहर पोलिसांना देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक देवंेंद्रसिंह ठाकुर, जमादार गणाजी पोटे, अशोक धामणे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी बँकेकडे अधिक चौकशी केली असता त्यात ५४ हजार रुपयांची रक्कम असल्याचे स्पष्ट झाले. रक्कम सुरक्षित दरम्यान, पोलिसांनी पाहणी केल्यानंतर सदर रक्कम सुरक्षित असल्याचे दिसून आले. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत आरसेवार यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास दोघे जण एटीएमसोबत छेडछाड करीत असल्याचे दिसून आले. त्यावरून आता पोलिसांनी त्या दोघांची ओळख पटवून शोध घेण्यासाठी हिंगोली शहर पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके रवाना केली आहेत. या प्रकरणी सायंकाळी उशीरापर्यंत हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नाही.
Source link
हिंगोलीत एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला:54 हजार रुपयांची रक्कम सुरक्षित, पोलिस अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी