Headlines

18 वर्षीय तरुणावरील अत्याचार: दोघांना जन्मठेप:पुणे न्यायालयाने लोहमार्ग पोलिसांच्या तपासावर शिक्कामोर्तब, प्रत्येकी 25 हजारांचा दंड




पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने २०१६ मध्ये १८ वर्षीय तरुणावर झालेल्या अत्याचारप्रकरणी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच दोन्ही दोषींना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. नाफडे यांनी सोमवारी हा निकाल दिला. दोषी ठरलेल्यांमध्ये शरद मुरलीधर साळवे (वय ३५) आणि अंकितसिंग रतनसिंग बिस्ता ऊर्फ कांचन (वय ३४) यांचा समावेश आहे. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता ॲड. एस. ए. भोसले यांनी प्रभावी युक्तिवाद केला. प्रकरणानुसार, २०१६ मध्ये बारामती येथून रेल्वेने प्रवास करत असलेल्या १८ वर्षीय तरुणाला आरोपींनी जेवण देण्याच्या बहाण्याने फूस लावले. त्याला रेल्वे स्थानक परिसरातील पार्किंगमधील एका पाराशेडमध्ये नेऊन त्याच्यावर अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक शमसुद्दीन शेख यांनी या प्रकरणाचा बारकाईने तपास करून आरोपींविरोधात भक्कम पुरावे गोळा केले. न्यायालयात एकूण १२ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. तपासादरम्यान संकलित केलेले पुरावे, साक्षीदारांची साक्ष आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवले. या प्रकरणाच्या तपासात पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, अपर पोलिस अधीक्षक विशाल गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी रोहित गायकर, पोलिस निरीक्षक प्रभाकर शेंडगे, शांताराम फड, सहायक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय मोरे, सचिन यादव आणि विजय शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. लोहमार्ग पोलिसांनी केलेल्या प्रभावी तपासामुळे या गंभीर गुन्ह्यात आरोपींना कठोर शिक्षा मिळाली. यामुळे तपास यंत्रणेच्या कामगिरीवर न्यायालयाने अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब केल्याचे मानले जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *