Headlines

318 वर्षांच्या परंपरेत प्रथमच!:संत मुक्ताई पालखीचा ऐतिहासिक रिंगण सोहळा प्रथमच जालन्यात; हजारो वारकऱ्यांचा भक्तिभावाने सहभाग




तब्बल 318 वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या संत मुक्ताई पालखी सोहळ्यातील ऐतिहासिक रिंगण सोहळा रविवारी प्रथमच जालना शहरात पार पडला. सकाळी साडेसात वाजता सुरू झालेल्या या सोहळ्याला राज्याच्या विविध भागांतून आलेल्या हजारो वारकऱ्यांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत भक्तिभावाने सहभाग नोंदविला. हरिनामाच्या गजराने, टाळ-मृदुंगाच्या निनादाने आणि अभंगांच्या सुरांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
संत मुक्ताई पालखीचे जालन्यात शनिवारी आगमन झाल्याने वारकरी तसेच नागरिकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण होते. रिंगण सोहळा सुरू होताच “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “मुक्ताई माऊली”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. पालखीचे दर्शन घेण्यासाठी आणि ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रिंगण सोहळ्यात विविध दिंड्या, फडकरी, महिला वारकरी आणि युवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषा, टाळ-मृदुंगाचा गजर, हरिपाठ आणि अखंड नामस्मरणामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले. वारकरी परंपरेतील समता, सेवा आणि भक्तीचा संदेश या सोहळ्यातून अनुभवायला मिळाला.
सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षा, वाहतूक नियंत्रण, आरोग्य सेवा आणि पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था केली होती. विविध सामाजिक संस्था व स्वयंसेवकांनी वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. 318 वर्षांच्या संत मुक्ताई पालखी परंपरेत प्रथमच जालना येथे पार पडलेला हा ऐतिहासिक रिंगण सोहळा वारकरी संप्रदायाच्या इतिहासातील अविस्मरणीय क्षण ठरला. हजारो भाविकांनी या सोहळ्याचा आनंद घेत भक्ती, श्रद्धा आणि वारकरी संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *