![]()
“कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघ निवडणुकीत भाजपचे नेते ‘झिरो-25’चा दावा करत होते, मात्र बॅलेट पेपरवर झालेल्या या निवडणुकीत कोल्हापूरच्या क्रांतिकारी जनतेने भाजपाची पूर्णपणे मस्ती उतरवून त्यांना 25-0 ने पराभूत केले आणि ते जनतेसमोर खऱ्या अर्थाने ‘झिरो’ ठरले आहेत,” असे अत्यंत आक्रमक उद्गार काढत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच, अलीकडेच चर्चेत आलेली 500 कोटींची 32 मिनिटांची कथित ऑडिओ क्लिप आपण मुंबईतून येताना रस्त्यात पुन्हा-पुन्हा शब्दशः ऐकल्याचे सांगत, या क्लिपमधून राजकीय मित्र, पत्रकार आणि विरोधकांचा कसा ‘गेम’ केला जातो, याचा पर्दाफाश झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत भास्कर जाधव यांनी गोकुळ दूध संघाच्या निकालापासून ते मराठा आरक्षण, कथित ऑडिओ क्लिप आणि सुशीलकुमार शिंदेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर आपली रोखठोक भूमिका मांडली. बॅलेटवरील निवडणुकीत कोल्हापूरच्या जनतेने भाजपचा उदोउदो जिरवला गोकुळ दूध संघाच्या ऐतिहासिक विजयाचे कौतुक करताना भास्कर जाधव म्हणाले, “गोकुळ दूध संघ निवडणुकीत भाजपचे नेते अत्यंत घमेणीची आणि अहंकाराची भाषा वापरत होते. त्यांच्याकडे 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदार आणि फोडून आणलेले अनेक नेते असतानाही ते हा अहंकार बाळगून होते की, विरोधी पक्षाच्या पॅनेलला 0 जागा मिळतील आणि आम्हाला 25 पैकी 25 जागा मिलतील. पण ते हे विसरले होते की ही निवडणूक ईव्हीएमवर नव्हे, तर बॅलेट पेपरवर होती.” सत्ताधाऱ्यांची मस्ती जनता उतरवू शकते “कोल्हापूरच्या सुजाण जनतेने पैशाच्या जीवावर चाललेला उन्माद लोहमार्गाने मोडून काढला. बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्यावर काय होते आणि माजलेल्या सत्ताधाऱ्यांना जनता कशी हिरोवरून झिरो करू शकते, हे कोल्हापूरने दाखवून दिले आहे.” सुशीलकुमार शिंदेंवर ना चौकशी, ना भ्रष्टाचार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना भाजपच्या प्रवेशाची ऑफर असल्याच्या चर्चांवर भाष्य करताना जाधव म्हणाले, “सुशीलकुमार शिंदे यांच्यावर कधीही ईडी, सीबीआय, एनआयए किंवा इन्कम टॅक्सची कोणतीही चौकशी झालेली नाही. त्यांच्यावर कसलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. मग अशा स्वच्छ प्रतिमेच्या नेत्याला भाजपची ऑफर का येईल, हे मला सांगता येणार नाही.” भाजपच्या वॉशिंग मशिनवर टोला “आजपर्यंत महाराष्ट्रात काय घडले? ज्यांच्यावर 70 हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, त्यांना मंत्रिमंडळात घेतले. आदर्श घोटाळ्याचे आरोप असलेल्यांना घेतले, छगन भुजबळ, नारायण राणे, विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर त्यांना पक्षात व मंत्रिपदात घेतले. राधाकृष्ण विखे पाडलांनी माळशिरसमध्ये १ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांवर केला होता, आणि नंतर त्यांनाही मंत्रिमंडळात घेतले. त्यामुळे ‘पार्टी विथ अ डिफरन्स’ म्हणणाऱ्या भाजपच्या निकषांमध्ये सुशीलकुमार शिंदे बसत नसल्याने त्यांना ऑफर का आली, याचे आश्चर्य वाटते.” मराठा आरक्षणाचा पहिला निर्णय नारायण राणे समितीनेच घेतला होता! मराठा आरक्षणाच्या इतिहासावर प्रकाश टाकताना त्यांनी सत्ताधारांचे दावे खोडून काढले. “मराठा समाजाला आरक्षण देण्याचा पहिला निर्णय आणि कायदा 2013-14 मध्ये नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या माध्यमातून झाला होता. मी त्या सरकारमध्ये मंत्री होतो आणि नारायणराव राणे त्या समितीचे प्रमुख होते. त्या आरक्षणाला न्यायालयात मुस्लिम आरक्षणासह मंजुरी मिळाली होती आणि अनेकांना नोकऱ्याही मिळाल्या होत्या.” फडणवीसांनी मराठा समाजाला फसवले “नंतर अशोकराव चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अत्यंत अभ्यासपूर्ण बाजू मांडली. आज अशोकराव चव्हाण आणि नारायण राणे तिकडे (भाजपसोबत) गेले असले, तरी मराठा आरक्षणाचा जन्म 2013-14 मध्येच झाला होता. एकनाथ शिंदेंनी हे आरक्षण दिलेले नाही. उलट देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला पूर्णपणे फसवण्याचे काम केले आहे, हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय.” 32 मिनिटांची क्लिप मी रस्त्यात पुन्हा-पुन्हा ऐकली राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या ३२ मिनिटांच्या ऑडिओ क्लिपवर बोलताना भास्कर जाधव अत्यंत आक्रमक झाले. “परवा मुंबईहून येताना मी रस्त्यामध्ये ती 32 मिनिटांची ऑडिओ क्लिप शब्दशः पुन्हा-पुन्हा ऐकली. या क्लिपमध्ये हे लोक कशा पद्धतीने वागतात, याचा संपूर्ण कच्चाचिट्ठा आहे.” कोणालाही सोडले नाही “या 32 मिनिटांच्या संभाषणात राजकीय मित्रांचा कसा गेम करायचा, पत्रकारांना कसे वेठीस धरायचे, खोटे नरेटिव्ह कसे पसरवायचे आणि हजारो कोटी रुपये खर्च करून विरोधकांना कसे संपवायचे, याची सविस्तर रणनीती आखल्याचे समोर आले आहे. यात एकनाथ शिंदेंना सोडलेले नाही, मनोज जरांगे पाटलांना सोडलेले नाही आणि इतर विरोधी नेत्यांनाही सोडलेले नाही. खोटे बोलून सातत्याने सत्ता कशी मिळवायची, याचे एक दुष्टचक्र यातून रचले जात असल्याचे त्यातून स्पष्ट होते,” असे उघडपणे सांगत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. ————————————————————- हेही वाचा… सूत्राच्या जिवाची हमी दिली तर शिंदे-फडणवीसांना क्लिप देतो!:मनोज जरांगे म्हणाले- षड्यंत्र उघड केल्याने आता दोन्ही पक्ष माझ्या मागे लागतील “गोरगरीब मराठा समाजाच्या आणि माझ्या राजकीय अस्तित्वाच्या विरोधात पडद्यामागे नेमके किती भयंकर कटकारस्थान शिजत होते, हे मी ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून उघडकीस आणले आहे. स्वतःचा हा मोठा अपराध झाकण्यासाठी आणि सत्य पचवण्याची हिंमत नसल्याने आता भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन माझ्या मागे लागतील, अशी दाट शक्यता आहे. मात्र, या सर्व राजकीय ताकदीला मी एकटाच पुरून उरेन! विशेष म्हणजे, माझी पत्रकार परिषद होण्याच्या 2 तास आधीच केवळ श्रीकांत शिंदेंच्या 500 कोटींच्या उल्लेखाची क्लिप टीव्ही चॅनेलवर रामदास कदमांनी वाजवली; मग एकनाथ शिंदेंची खरी बदनामी मी केली की रामदास कदमांनी?” असा खडा सवाल मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. वाचा सविस्तर
Source link
32 मिनिटांची क्लिप मी पुन्हा-पुन्हा ऐकली:राजकीय मित्र, पत्रकार अन् विरोधकांचा कसा गेम केला जातो, हे त्यात उघड झालेय -भास्कर जाधव