Headlines

5 वर्षांत घरगुती वीज 26 टक्क्यांनी स्वस्त होणार:मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, CII वार्षिक परिषदेत मांडला महाराष्ट्राचा रोडमॅप




महाराष्ट्राला ‘ट्रिलियन डॉलर’ इकॉनॉमी बनवण्याच्या दिशेने सरकार वेगाने पावले उचलत असून, त्याचा मोठा फायदा सर्वसामान्यांना मिळणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज ‘सीआयआय’च्या (CII) वार्षिक बैठकीतनंत माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्योगांसाठी आणि घरगुती ग्राहकांसाठी वीज दरात मोठी कपात होणार असल्याची माहिती दिली. तसेच, इंधन बचतीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या राहुल गांधींचा ‘रिजेक्टेड माल’ असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी जोरदार पलटवार केला. ‘द फ्युचर’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या ‘सीआयआय’ बिझनेस समिटमध्ये मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. “भविष्यात महाराष्ट्र कसा असेल? आणि तो आम्ही कसा घडवतो? हे मी सांगितले आहे. महाराष्ट्र आज वेगवेगळ्या क्षेत्रात लीडर आहे, हे याठिकाणी सांगितले. इंजिनिअरिंग, एफडीआय, स्टार्टअप, अशा क्षेत्रामध्ये महाराष्ट्र क्रमांक एक वर आहे. अशा महाराष्ट्राच्या स्ट्रेंथ लिबरेज करून आम्ही ट्रिलियन डॉलर इकोनॉमी कशी तयार करतोय, याची माहिती दिली,” असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. वीज दरात मोठी कपात उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी मुख्यमंत्र्यांनी वीज दराबाबत महत्त्वाची माहिती दिली. “२०२५ ते २०३० या काळासाठीचे ‘मल्टी इअर टॅरिफ’ मंजूर झाले आहेत. पूर्वी दरवर्षी विजेचे दर ९ टक्क्यांनी वाढायचे. मात्र, आता नवीन धोरणानुसार उद्योगांसाठी दरवर्षी वीज दरात २ ते ३ टक्के कपात होणार आहे. घरगुती वापरासाठी येत्या पाच वर्षांत वीज दरात तब्बल २६ टक्क्यांनी कपात होणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील उद्योग अधिक स्पर्धात्मक होतील आणि सर्वसामान्यांच्या खिशावरील भारही कमी होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इंधन बचत आणि जागतिक परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाचे मुख्यमंत्र्यांनी समर्थन केले. शेजारील पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे दर ४५० रुपयांच्या पार गेले असताना, भारतात मोदींच्या नियोजनामुळे इंधनाचा तुटवडा जाणवलेला नाही. मात्र, परकीय चलन वाचवण्यासाठी आणि जागतिक अर्थव्यवस्थेवरील ताण पाहता अनिर्बंध वापर टाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. राहुल गांधी म्हणजे रिजेक्टेड माल पंतप्रधानांच्या आवाहनावर टीका करणाऱ्या राहुल गांधींना मुख्यमंत्र्यांनी शेलक्या शब्दांत उत्तर दिले. “पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा अर्थ राहुल गांधींना कळला नाही, तर त्यांना दोष देता येत नाही. कुठेतरी त्यांची समज कमी आहे. पण तो जनतेला कळला आहे. त्यामुळे जनता प्रतिसाद देईल. देशामध्ये सर्वात नाकारलेला नेता, रिजेक्टेड माल हे राहुल गांधी आहेत. त्याला तुम्ही महत्त्व देता, आम्ही देत नाही,” असा टोला फडणवीस यांनी लगावला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *