![]()
मी ‘ट्यूशन एरिया’त उभा आहे. नीट पेपरफुटीमुळे हा परिसर ओस पडला आहे. सुमारे ५० हजार विद्यार्थी आपल्या गावी परतल्यामुळे दिवसाकाठी क्लासेसची फी, मेस, हॉस्टेल्समधून होणारी सुमारे २ कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. २ जूनपर्यंत सर्व क्लासेस बंद ठेवण्यात आले आह
.
नीट, जेईई आणि सीईटी परीक्षांची तयारी करून घेणारे ५५ पेक्षा जास्त क्लासेस आहेत. यामध्ये दरवर्षी जवळपास ६० हजारपेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेश घेतात. यातील प्रमुख ५ ते ६ मोठ्या क्लासेसमध्येच ८० टक्के विद्यार्थी शिकतात. उर्वरित २० टक्के विद्यार्थी अन्य ५० लहान क्लासेसमध्ये शिक्षण घेतात. एका विद्यार्थ्याची वार्षिक क्लास फी ४० हजार ते ८० हजार रुपयांपर्यंत आहे. केवळ क्लासेसच्या माध्यमातून वर्षाला ३०० कोटींची उलाढाल होते.
हॉस्टेल, मेस व्यवसायिकांना फटका
लातूरमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर येथील ४०० हॉस्टेल व २८० मेस (खानावळ) व्यवसाय अवलंबून आहेत. विद्यार्थ्यांकडून राहणे आणि जेवणासाठी वर्षाला ६० हजार ते १ लाख २० हजार रुपये आकारले जातात. यातून राहणे-खाणे व इतर खर्चाच्या रूपाने शहरात वार्षिक ४५० कोटींची उलाढाल होते. मात्र, आता विद्यार्थीच नसल्याने ४०० पैकी केवळ ४० ते ५० हॉस्टेल व २८० पैकी फक्त २५ मेस कशाबशा सुरू आहेत. ग्राहकांअभावी व तोट्यामुळे अनेकांनी आपले हॉस्टेल तात्पुरते बंद केले. सुरू असलेल्या मेस चालकांनी महिन्याला ३०० रुपयांची दरवाढ केली.
२ जूनच्या नवीन बॅचबाबत उत्सुकता
नीट पेपरफुटीच्या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. परिणामी, विद्यार्थी लातूरला येऊन अभ्यास करण्याऐवजी घरूनच री-नीट परीक्षेची तयारीत आहेत. पुन्हा विद्यार्थी लातूरला येतील का, या भीतीने स्थानिक व्यावसायिक चिंतेत आहेत. आता २ जून रोजी सुरू होणाऱ्या नवीन बॅचला विद्यार्थी किती संख्येने उपस्थित राहतात, यावरच लातूरच्या या ७५० कोटींच्या अर्थकारणाचे भविष्य अवलंबून असेल.
बीड : प्रा.कुलकर्णीच्या अपार्टमेंटचे नियम मोडून बांधकाम
कोचिंग हब म्हणून प्रसिद्ध भागात काही क्लासचालक व पालकांची चौकशी झाली. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. पेपरसेटर प्रा.कुलकर्णीने शाहुनगरात नियम मोडून बांधकाम केले. त्याला पालिकेने नोटीस बजावली.
नांदेड : १० पालकांना चौकशीसाठी पुण्याला बोलावले
सीबीआयने नांदेडमध्ये १० पालकांना चौकशीसाठी पुण्याला हजर राहण्याची नोटीस दिली आहे. त्यात ३ डॉक्टरांचा समावेश आहे. हे सर्व मोटेगावकरच्या संपर्कात होते. त्यांनी पाल्यासाठी प्रश्नपत्रिका मिळवल्याचा संशय आहे.
लातूर : मोटेगावकरच्या हॉस्टेलमधील विद्यार्थ्याचा जबाब
प्रा. मोटेगावकरच्या क्लासेसशेजारील सीतारामनगर येथील वसतिगृहात एका विद्यार्थ्याची ३ तास चौकशी करण्यात आली. या मुलाचे आधार कार्ड, पॅनकार्ड या कागदपत्रांसह त्याचा जबाब नोंदवून हे पथक निघून गेले.
नांदेडचे ३, लातूरच्या २ डॉक्टरांसह ७ पालकांची पुण्यात सीबीआय चौकशी करणार
सीबीआयने नीट पेपरफुटी प्रकरणात अटक केलेल्या पेपरसेटर प्रा. पी. व्ही. कुलकर्णीने पुण्यातील स्वत:च्या घरात विद्यार्थ्यांचे खास क्लास घेऊन नीट परीक्षेतील प्रश्न त्यांना पुरवले, अगदी तसेच क्लास त्याने लातूर शहरातील एका बालरोगतज्ज्ञाच्या इमारतीतही घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्याची बुधवारी पुण्यात चौकशी झाली. या क्लासमध्ये प्रा. शिवराज मोटेगावकरच्या मुलासह लातुरातील २ तसेच नांदेडातील ३ डॉक्टरांच्या मुलांचाही सहभाग असल्याचा सीबीआयला संशय आहे.
लातूर शहरात गेल्या ५ दिवसांपासून सीबीआयचे पथक ठाण मांडून आहे. पुणे व दिल्ली येथून जसे निरोप येत आहेत त्याप्रमाणे शहरातील संशयित व्यक्तींची सीबीआयचे पथक चौकशी करत आहेत. सीबीआयच्या पथकाने मंगळवारी रात्री ४ तास औसा रोडवरील एका बालरोगतज्ज्ञाची चौकशी केली. त्यानंतर घरातील काही साहित्य, इलेक्ट्रॉनिक गॅजेट घेऊन हे पथक रवाना झाले.
पुन्हा तयारीसाठी येणार नाही
पेपरफुटीमुळे मानसिक व आर्थिक स्थिती ढासळत आहे. री-नीट परीक्षेतील गुणानुसार जे कॉलेज मिळेल, त्याला प्रवेश घेणार आहे. पुन्हा लातूरला तयारीसाठी येणार नाही. – संग्राम मुंडे, विद्यार्थी
दोन वर्षांत १० लाखांचा खर्च
एकुलत्या एक मुलासाठी चारपैकी अर्धा एकर शेती साडेतीन लाखात विकली. १३० किमी दूर लातूरला येऊन शिफ्ट झालो. दोन वर्षांत दहा लाखांचा खर्च झाला. परंतु, आता नीटचा पेपर फुटल्यामुळे नैराश्य आहे. – काशिनाथ दोडके, पालक
प्रतिदिन ५ लाख रुपये होते पेपरसेटर प्रा.कुलकर्णीच्या विशेष क्लासचे शुल्क
पेपरसेटर प्रा. पी.व्ही. कुलकर्णीने खास विद्यार्थ्यांसाठी बालरोगतज्ज्ञाच्या रुग्णालयात काही दिवस क्लास घेतले होते. त्याने प्रतिदिन ५ लाख रुपये शुल्क आकारले. लातुरातील औसा रोडवरील एका बालरोगतज्ज्ञाच्या मुलीने गतवर्षी नीटची परीक्षा दिली होती आणि ती सध्या एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. या डॉक्टरच्या पुतणीने या वर्षी नीटची परीक्षा दिली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पुण्यात डेक्कन जिमखाना परिसरातील ‘आरसीसी क्लास’च्या आवाराला मनपाने ३ कोटी २० लाखांच्या कर थकबाकीसाठी टाळे ठोकले. मनसेने या कारवाईसाठी आंदोलन केले होते. याशिवाय इमारतीच्या तळघरात लोखंडी पत्रे लावून तयार केलेले अनधिकृत तात्पुरते कार्यालय मनपाने जेसीबीच्या साहाय्याने तोडले.
नागपूरच्या संशयिताने सुमारे १ हजार विद्यार्थ्यांना पेपर विकल्याचा संशय
नागपूर : आलोक नावाच्या संशयिताने सुमारे एक हजार विद्यार्थ्यांना नीटचा पेपर विकल्याचा दाट संशय सीबीआयला आहे. नांदेडच्या विद्युतनगरमधील अश्विनी कदम नावाच्या महिलेने आपल्या मुलीसाठी तब्बल ५ लाख रुपयांना पेपर खरेदी करत २५ हजार ऑनलाइन टोकन मनी म्हणून दिले. त्यानंतर आलोकने या मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना १५ दिवस पुण्यात प्रत्यक्ष पेपर देऊन त्याची पूर्वतयारी करून घेतल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
बुधवारी दिल्लीच्या राउज ॲव्हेन्यू कोर्टाने मंगलाल खटीक, विकास बिवल, दिनेश बिवल, यश यादव आणि धनंजय लोखंडेला २ जूनपर्यंत न्यायालयीने कोठडीत पाठवले. शुभम खैरनारची सीबीआय कोठडी ५ दिवस वाढवली. कोर्टाने मनीषा मांढरे, माटेगावकरच्या सह्यांचे नमुने घेण्याची परवानगी दिली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बनावट टेलिग्राम चॅनल्स आणि पेपर लीकवर संभ्रम पसरवणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.
वाघमारे, मांढरेच्या मोबाइलमधून नीटचा पेपर विकत घेणाऱ्यांची नावे मिळाली
पुणे सीबीआयला पेपरसेटर मनीषा मांढरे, ब्यूटिशियन मनीषा वाघमारेच्या मोबाइलमधून पेपर विकत घेणाऱ्यांची नावे मिळाली. त्या दृष्टीने छापेमारीसाठी सीबीआय व पुणे पोलिसांचे ५० ते ६० कर्मचारी तयारीत आहेत. या दोघींना पुण्यात आणून चौकशी होईल. मोटेगावकरच्या मुलाची साडेपाच तास चौकशी झाली. प्रा. मांढरेच्या मॉडर्न कॉलेजातील लॉकर, कपाटाची झडती घेऊन सीबीआयने नीटच्या जुन्या प्रश्नपत्रिका, सराव पेपर, कागदपत्रे नेली.
मांढरे, मोटेगावकरच्या सह्यांचे नमुने घेण्यास कोर्टाची परवानगी
अवधेश आकोदिया, जयपूर, नवी दिल्ली | सीबीआय चौकशीत समोर आले आहे की पेपर लीक टोळीने नातेवाइकांची पत पाहून ५ ते ५० लाख रुपयांमध्ये सौदा केला होता. पेपर खरेदी करणाऱ्यांनी पूर्ण पैसे अॅडव्हान्स दिले नाहीत, फक्त टोकन मनी दिली. उर्वरित रक्कम बुडू नये, यासाठी नातेवाइकांकडून ब्लँक चेक आणि विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे गॅरंटी म्हणून घेण्यात आली. ८ मेच्या रात्री जेव्हा राजस्थान चौकशी पथकाने कारवाई सुरू केली, तेव्हा ही टोळी वसुली करण्यातच व्यग्र होती. सीकरमध्ये पेपर खरेदी करणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या चौकशीदरम्यानच त्याच्या पैशांसाठी दलालाचा फोन आला होता.