![]()
सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना पक्ष व चिन्हाविषयी संक्षिप्त सुनावणी पार पडली. या सुनावणीत सरन्यायाधीशांनी या खटल्याच्या विलंबाविषयी ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात येणाऱ्या अनावश्यक विधानांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रस्तुत प्रकरण सूचिबद्ध केले जाते, तेव्हा तुम्ही तारीख द्या म्हणता आणि नंतर माध्यमांमध्ये जाऊन बेजबाबदार विधाने करता. हे आम्ही सहन करणार नाही. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या लोकांना माध्यमांत जाऊन सर्वोच्च न्यायालय निर्णय घेत नाही अशी बेजबाबदार विधाने करण्यापासून रोखा, असे कोर्ट ठाकरे गटाच्या वकिलांना ठणकावण्याच्या सूरात म्हणाले. शिवसेना पक्ष व चिन्हाशी संबंधित याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वकील देवदत्त कामत यांनी या प्रकरणावर लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली. त्यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देवदत्त कामत यांना चांगलेच खडेबोल सुनावले. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या लोकांना माध्यमांमध्ये जाऊन सुप्रीम कोर्ट निर्णय घेत नाही अशी बेजबाबदार विधाने करण्यापासून रोखा. आम्ही दोन्ही पक्षांकडून सहकार्याची अपेक्षा करतो, असे ते म्हणाले. खाली वाचा कोर्टातील युक्तिवाद देवदत्त कामत – कोर्टाने आपल्या सोयीनुसार लवकरात लवकर हे प्रकरण हाती घ्यावे. सरन्यायाधीश – सर्वप्रथम तुम्ही तुमच्या लोकांना माध्यमांकडे जाऊन सुप्रीम कोर्ट निर्णय देत नाही अशी बेजबाबदार विधाने करण्यापासून थांबवा. तुम्ही हे इथे मागता (तारीख) आणि मग म्हणता की सुप्रीम कोर्ट निर्णय देत नाही. आम्ही एक इशारा देत आहोत. शब्दांचा जपून वापर करा. असे वर्तन स्वीकारार्ह नाही. देवदत्त कामत – हे प्रकरण आज निर्देशांसाठीच्या यादीत दाखवण्यात आले होते. सरन्यायाधीश – न्यायालय दोन्ही पक्षांकडून सहकार्याची अपेक्षा करते. देवदत्त कामत – आम्हाला काही अडचण नाही. न्यायालयाला प्रत्येक पक्षासाठी 2 तासांचा वेळ मिळेल तेव्हा आपण हे प्रकरण निश्चित करू शकता. आम्ही चिंतीत आहोत, कारण आम्ही या प्रकरणी मागील 3 वर्षांपासून वाट पाहत आहोत. सरन्यायाधीश – आम्ही एक तारीख निश्चित करू. चिंता ही आहे की, सुनावणीच्या ज्या कोणत्या टप्प्यावर विलंब झाला, त्यावर अशी बेजबाबदार विधाने केली जात आहेत. मुकूल रोहतगी (सरकारतर्फे) – आम्हाला माहिती आहे की, किती दबाव आहे. सरन्यायाधीश – आम्ही दुपारी 4 वाजेपर्यंत इथे बसलेले असतो. कुणी आम्हाला रिकामे बसलेले पाहिले असेल, तर आम्ही समजू शकतो. देवदत्त कामत – वकील अशा विधानांना केव्हाही पाठिंबा देणार नाहीत. मुकूल रोहतगी – यात काही शंका नाही की, कोर्टाने सर्वांशी खूप संयमाने व दयाळूपणे व्यवहार केला. कोणत्याही बाजूच्या कोणत्याही पक्षकाराला असे बोलण्याचा अधिकार नाही. सरन्यायाधीश – हे प्रकरण सूचिबद्ध केले जाते, तेव्हा तुम्ही तारीख मागता. त्यानंतर माध्यमांमध्ये जाऊन विधाने करतात. कोर्ट हे सहन करणार नाही. काळजीपूर्वक वागा. देवदत्त कामत – या प्रकरणाला 2-3 तास लागतील. जेव्हा तुम्हाला थोडा वेळ मिळेल, तेव्हा आम्ही काही दिवसांत हे संपवू. आमची काहीही अडचण नाही. आम्ही 3 वर्षांपासून तयार आहोत. मुकूल रोहतगी – कृपया हे प्रकरण जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ठेवा. सरन्यायाधीश – या प्रकरणी 30 जुलै रोजी पुढील सुनावणी होईल.
Source link