![]()
पोलिस भरतीसाठी धावण्याचा सराव करणाऱ्या एका तरुणाला अडवून त्याच्यावर चाकूने हल्ला करून मोबाइल लुटल्याची घटना करमाड एमआयडीसी परिसरात गुरुवारी (१४ मे) सायंकाळी पावणेआठ वाजता घडली. प्रमोद साहेबराव निकाळजे (१९, रा. रेल्वे स्टेशन परिसर, करमाड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. प्रमोद हा पोलिस भरतीची तयारी करत असून, तो दररोज करमाड एमआयडीसी परिसरात धावण्याचा सराव करीत होता. गुरुवारी सायंकाळी साडेसात ते पावणेआठच्या सुमारास तो एमआयडीसीतील एका कंपनीमागील रस्त्यावर सराव करत असताना काळ्या रंगाच्या स्कुटीवरून तोंड बांधलेल्या दोन अज्ञातआरोपींनी त्याला अडविले. आरोपींनी त्याचा मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रमोदने पळण्याचा प्रयत्न केला; मात्र समोरून आणखी दोन जण दुचाकीवर आल्याने तो त्यांच्या कचाट्यात सापडला. आरोपींनी प्रमोदच्या दंडावर व पाठीवर चाकूने वार केले. तसेच ४९ हजार रुपये किमतीचा मोबाइल लुटून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमी अवस्थेत प्रमोद घरी पोहोचला. त्यानंतर त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या पाठीवरील गंभीर जखमांवर १२ टाके घालण्यात आल्याची माहिती आहे. याप्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. एमआयडीसी परिसरातील नागरिकांमध्ये भीती करमाड एमआयडीसी परिसरात पोलिस भरतीची तयारी करणारे युवक तसेच सकाळ-सायंकाळ फिरण्यासाठी अनेक नागरिक येत असतात. यापूर्वीही लुटमारीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
Source link
पोलिस भरतीची तयारी; युवकावर चाकूहल्ला:करमाड एमआयडीसीत घटना, मोबाइल पळविला