.


तालुक्यातील मंगरूळ येथे शेतातून घरी येताना ३० वर्षीय युवकाचा दुचाकीवरून पडल्याने अपघाती मृत्यू झाल्याची घटना रविवार (१० मे) रोजी घडली होती. या प्रकरणी पोलिसांच्या तपासात मृत्यूचा उलगडा झाला असून, दारूच्या नशेत गावकऱ्याशी भांडल्याने सख्ख्या भावानेच लहान भावाचे डोके जमिनीवर आपटून खून केल्याचे उघडकीस आले आहे. शुभम बालाजी खेळवणे (३०) असे मृताचे, तर अतुल बालाजी खेळवणे (३४) असे आरोपी भावाचे नाव आहे. मंगरूळच्या शेतशिवाराच्या रस्त्यावर १० मे रोजी शुभम दुचाकीवरून घसरून पडल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. सिल्लोड ग्रामीण ठाण्यात आकस्मातची नोंद केली होती. ज्या वाहनाचा अपघात झाला, त्याचे कसलेही नुकसान झाले नव्हते. मयताच्या शरीरावरील जखमा अपघाताच्या वाटत नव्हत्या. तांत्रिक माहिती आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवले. आरोपीला न्यायालयाने ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. – रवींद्र ठाकरे, सहायक पोलिस निरीक्षक, सिल्लोड ग्रामीण ठाणे मृत शुभम सिल्लोड येथील एका खासगी बँकेत नोकरीला होता. कुटुंबात आई-वडील, चार भाऊ यांचा समावेश असून आठ एकर जमीन आहे. तसेच तो अविवाहित होता. आरोपी अतुल खेळवणे हा विवाहित असून त्याला पत्नी व दोन मुले आहेत. खुन लपविण्यासाठी त्याने अपघाताचा बनाव रचला. पोलिसांनी घटनास्थळ, वाहनाची पाहणी केली. तेव्हा त्यांना दुचाकीचे नुकसान झाले नसल्याचे दिसून आले. शुभमच्या शरीरावर जखमा नव्हत्या. हाच धागा पकडून सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गावातील साक्षीदारांची चौकशी सुरू केली. शेवटी तांत्रिक पुराव्यांसमोर आरोपी अतुलचा बनाव समोर आला. पोलिसांनी गुरुवारी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली. घटनेच्या दिवशी शुभमने दारूच्या नशेत एका व्यक्तीशी वाद घालून शिवीगाळ केली होती. ही बाब अतुल यास समजली. त्याने शुभमला घरी बोलावून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याचे डोके जमिनीवर आदळले. यात शुभमचा जागीच मृत्यू झाला. स्वताला वाचविण्यासाठी त्याने भावाचा अपघात झाल्याचा बनाव रचला होता.
शरीरावर जखमा नसल्याने बिंग फुटले
आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी