Headlines

नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक अटक:पुण्यातून प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना अटक; आरोपीने कशी फोडली प्रश्नपत्रिका? वाचा




वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या ‘नीट-युजी 2026’ परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाला आता एक नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेल्या पुण्यातील मनीषा गुरुनाथ मांढरे या वरिष्ठ शिक्षिकेला दिल्लीतून अटक केली आहे. या अटकेमुळे परीक्षा यंत्रणेतील अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एनटीएच्या ‘तज्ज्ञ’ पदाचा गैरवापर मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा मांढरे या पुण्यात वरिष्ठ वनस्पतीशास्त्र शिक्षिका म्हणून एका महाविद्यालयात कार्यरत होत्या. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने त्यांची या परीक्षेसाठी विषय तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती. या पदाचा फायदा घेत त्यांना वनस्पतीशास्त्र आणि प्राणिशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकांची पूर्ण माहिती आणि अ‍ॅक्सेस मिळाला होता. मात्र, त्यांनी या गोपनीयतेचा भंग करून परीक्षेची विश्वासार्हता धोक्यात आणली. अशी फुटली प्रश्नपत्रिका सीबीआयच्या तपासात समोर आले की, एप्रिल २०२६ दरम्यान मनीषा मांढरे यांनी पुणे येथील मनीषा वाघमारे (जिच्यावर १४ मे रोजी आधीच कारवाई झाली आहे) हिच्या मदतीने काही निवडक परीक्षार्थींना एकत्र केले. मांढरे यांनी आपल्या राहत्या घरी या विद्यार्थ्यांसाठी विशेष ‘कोचिंग क्लासेस’ घेतले. या वर्गांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष परीक्षेत येणारे प्रश्न विद्यार्थ्यांना लिहून दिले आणि त्यांच्या पाठ्यपुस्तकात खुणा करून दिल्या. ३ मे २०२६ रोजी झालेल्या प्रत्यक्ष परीक्षेतील बहुतांश प्रश्न मांढरे यांनी आधीच दिलेल्या प्रश्नांशी तंतोतंत जुळले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *