![]()
देशासमोर सध्या निर्माण झालेले भीषण आर्थिक आणि ऊर्जा संकट पाहता, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक अत्यंत महत्त्वाचे आणि कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. आपल्या सुरक्षेसाठी शासनाकडून देण्यात आलेला पोलीस बंदोबस्त आणि शासकीय वाहने तातडीने काढून घेण्यात यावीत, असे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले आहे. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला अधिकृत आवाहन केले असून, त्यांच्या या निर्णयाची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सध्या जागतिक आणि देशांतर्गत पातळीवर निर्माण झालेल्या विविध घडामोडींमुळे भारतासमोर ऊर्जा आणि आर्थिक टंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत इंधन, वीज आणि इतर शासकीय संसाधनांचा अत्यंत जपून व काटकसरीने वापर करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशातील जनतेला काटकसर करण्याचे आवाहन केलेले आहे. याच पार्श्वभूमीवर, सरकारी तिजोरीवर नाहक भार पडू नये आणि देशाच्या इंधन बचतीला हातभार लागावा, यासाठी सुप्रिया सुळे यांनी स्वतःपासून व्हीआयपी सुविधांचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. नेमके काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? सध्या भारतासमोर भीषण आर्थिक तसेच उर्जासंकट उभा राहिले आहे. परिणामी इंधन आणि इतर संसाधनांचा जपून वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर माझे शासनाला नम्र आवाहन आहे की, कृपया आपण माझ्या सुरक्षेसाठी दिलेला पोलीस बंदोबस्त आणि त्यासोबत दिलेली वाहने तातडीने काढून घ्यावी. देशावरील उर्जा आणि आर्थिक संकट दूर झाल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेऊन तेंव्हा अगदीच गरज भासल्यास ती पुन्हा बहाल करण्याचा विचार करावा. परंतु सद्यस्थितीत आपण कृपया माझ्या सुरक्षेसाठी तैनात केलेला पोलीस बंदोबस्त आणि गाड्या काढून घ्याव्या. धन्यवाद, असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर इंधन बचतीसाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी आपल्या ताफ्यातील वाहने ५० टक्क्यांनी कमी केली आहेत. अशातच विरोधी पक्षातील एका बड्या नेत्याने थेट स्वतःची संपूर्ण सुरक्षा आणि शासकीय वाहनेच परत करण्याची मागणी केल्यामुळे या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
Source link
माझी सुरक्षा आणि गाड्या काढून घ्या:सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी, आर्थिक अन् ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर निर्णय