Headlines

प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू:काळ्या फिती लावून काम, सोमवारपासून भोजनावकाशात धरणे




विविध प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने पुकारलेले राज्यव्यापी आंदोलन जिल्ह्यात तीव्र झाले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठाचे कर्मचारी सहभागी झाल्यामुळे शैक्षणिक कामकाजावर परिणाम झाला आहे. आगामी सोमवारपासून कर्मचारी भोजनावकाशात आपापल्या संस्थेसमोर धरणे आणि निदर्शने करणार आहेत. हे आंदोलन शुक्रवार, १४ मे रोजी सुरू झाले. महासंघाचे अध्यक्ष अजय देशमुख यांच्या माहितीनुसार, राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांमधून या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात, शुक्रवारी राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध केला. हे प्रतीकात्मक आंदोलन यशस्वी ठरले असून, कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन आपली एकजूट आणि संताप व्यक्त केला. या आंदोलनाला आता शैक्षणिक वर्तुळातूनही पाठिंबा मिळत आहे. नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशनचे (नुटा) अध्यक्ष डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी या राज्यव्यापी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. डॉ. रघुवंशी यांनी संयुक्त कृती समितीच्या अध्यक्षांना पाठिंब्याचे अधिकृत लेखी पत्र दिले, ज्यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले आहे. या आंदोलनाची धग आता थेट मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे. राज्यभरातून मिळणारा वाढता पाठिंबा आणि कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेता, शासन दरबारी हालचालींना वेग आला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयातील सूत्रांनुसार, प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रशासकीय स्तरावर तातडीने बैठका सुरू झाल्या आहेत. यामुळे सरकारवर दबाव वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे. सेवक संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष अजय देशमुख यांनी सांगितले की, “आमच्या मागण्या रास्त आहेत. त्यामुळे शासन जोपर्यंत ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत हा लढा अधिक तीव्र केला जाईल. नुटासारख्या संघटनांच्या पाठिंब्यामुळे आमची बाजू अधिक भक्कम झाली आहे.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *