Headlines

पुण्यात 21 लाखांचे अमली पदार्थ जप्त:अंमली पदार्थ विरोधी पथकाची धानोरीत कारवाई, मूळ राजस्थानच्या दोन तरुणांना अटक




पुणे शहराच्या अंमली पदार्थ विरोधी पथक २ (गुन्हे शाखा) ने धानोरी परिसरात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे २१ लाख १३ हजार ७४८ रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, राजस्थानमधील मूळ रहिवासी असलेल्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाला धानोरी येथील सिद्धार्थनगर भागात अमली पदार्थांची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी चक्रधर निवास येथील एका घरावर छापा टाकला. या कारवाईत करणसिंह प्रेमसिंह राजपुरोहित (वय ४१, रा. धानोरी, पुणे) आणि राजुसिंह सहदेवसिंह राजपुरोहित (वय ४२, रा. सुखसागरनगर, पुणे) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या झडतीत पोलिसांना १०२.९१ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) आणि १०२.३८ ग्रॅम डोडा चुरा हे अमली पदार्थ सापडले. याव्यतिरिक्त, दोन मोबाईल फोन, रोख रक्कम आणि इलेक्ट्रिक वजनकाटा असा एकूण २१ लाख १३ हजार ७४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. ॲक्टच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक महेश भोसले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त विवेक मासळ आणि सहाय्यक पोलिस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडित रेजितवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीनकुमार नाईक आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीरित्या बजावली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *