![]()
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि कांद्याला योग्य भाव मिळवून देण्यासाठी आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट घेणार आहोत. कांद्याला कमीतकमी १५ रुपये प्रतिकिलो प्रमाणे भाव मिळावा, यासाठी आमचे विशेष प्रयत्न राहतील, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले. ताहाराबाद (ता. बागलाण) येथे रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) व ग्रामस्थांतर्फे आयोजित नागरी सत्कारप्रसंगी ते बोलत होते. नागरी सत्काराला उत्तर देताना मंत्री आठवले म्हणाले, गेल्या काही दिवसांत अवेळी झालेला वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. जोपर्यंत देशातील शेतकरी मजबूत होत नाही, तोपर्यंत देश मजबूत होणार नाही. त्यामुळे कांद्यासह इतर शेतीमालाला चांगला भाव मिळवून दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. तसेच, शेतकऱ्यांच्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षा व उद्योग-व्यवसायात पुढे येवून देशविकासात हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन यांच्या विकासकामांचे कौतूक केले. कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याबाबत गजानन साळवे यांनी मंत्री आठवले यांना निवेदन दिले. तसेच माजी जिल्हा परिषद सभापती यतीन पगार, के. पी. जाधव आदींनी विविध विकासकामांचे निवेदन दिले.
Source link
कांद्याच्या हमीभावासाठी पंतप्रधानांची भेट घेणार:ताहाराबाद येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे आश्वासन