![]()
पुणे महानगरपालिकेने उभारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती शिल्पाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. शिवाजीनगर येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात उभारण्यात आलेल्या या ‘बुधभूषण’ ग्रंथ रचनाकार शिल्पासाठी ५ कोटी रुपये खर्च आला आहे. हे शिल्प १० फूट उंचीचे असून, छत्रपती संभाजी महाराज ‘बुधभूषण’ ग्रंथाची रचना करतानाचे हे जगातील पहिले कांस्य शिल्प आहे. महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारचे शिल्प पुणे महानगरपालिकेने साकारले आहे. या प्रकल्पासाठी इतिहास तज्ज्ञ, संस्कृत आणि मराठी भाषा तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या संस्कृत ‘बुधभूषण’ ग्रंथातील आवश्यक श्लोक निवडले. हे निवडक ९ श्लोक मराठी व इंग्रजी अर्थासह, तसेच ‘बुधभूषण’ ग्रंथाची संक्षिप्त माहिती देणाऱ्या प्रस्तावनेसह भव्य १० दगडी भिंतींवर कोरण्यात आले आहेत. शिल्पाच्या भोवती रंगीत कारंजे, विविध शोभिवंत फुलझाडे आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अत्यंत कठीण काळात हिंदवी स्वराज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व जगासमोर आणणे हा या शिल्पामागील मुख्य उद्देश आहे. यामुळे पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर पडणार असून, नागरिकांना महाराजांच्या गौरवशाली इतिहासातून प्रेरणा मिळेल. या अनावरण सोहळ्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, महापौर मंजुषा नागपुरे, उप महापौर परशुराम वाडेकर, सभागृह नेता गणेश बिडकर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Source link
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या शिल्पाचे अनावरण:पुणे मनपाने उभारले 5 कोटींचे 'बुधभूषण' ग्रंथ रचनाकार शिल्प