Headlines

नागपुरात ‘सलमान भाई हेअर ट्रीटमेंट’ बेकायदेशीर शिबिराचा पर्दाफाश:भाजप वैद्यकीय आघाडीच्या पुढाकाराने मोठी कारवाई




नागपुरात ‘सलमान भाई हेअर ट्रीटमेंट’ या नावाने ‘१००% केस उगवण्याचे आयुर्वेदिक उपचार’ देण्याचा दावा करणाऱ्या एका बेकायदेशीर शिबिराचा पर्दाफाश करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी, नागपूर महानगरच्या पुढाकाराने ही धडक कारवाई करण्यात आली. या शिबिरामुळे नागरिकांची संभाव्य आर्थिक फसवणूक आणि आरोग्याचा धोका टळला आहे. सोशल मीडियावर ‘सलमान भाई हेअर ट्रिटमेंट’ या नावाने मोठ्या प्रमाणावर दिशाभूल करणारी प्रसिद्धी केली जात होती. संबंधित व्यक्ती देशातील विविध राज्यांमध्ये अशाच प्रकारचे फसवे कार्यक्रम आयोजित करत असल्याची माहिती समोर आली होती. नागपुरातील धरमपेठ येथील सुगंध सभागृह परिसरात हे शिबिर आयोजित करून ‘१००% आयुर्वेदिक इलाज’ अशा जाहिरातींद्वारे नागरिकांकडून मोठे शुल्क आकारले जात होते. या गंभीर प्रकरणाची दखल घेत भाजप वैद्यकीय आघाडी नागपूर महानगरचे अध्यक्ष डॉ. विनोद दाढे, डॉ. प्रणय चांदेकर, डॉ. अजय सारंगपुरे आणि राकेश कोंटमवार यांनी तातडीने पुढाकार घेतला. त्यांनी ही माहिती प्रशासन व शासनापर्यंत पोहोचवली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी सुनिल मित्रा, नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे उपसभापती श्रीकांत आगलावे व सभापती मनीषा अतकरे यांनी तत्काळ दखल घेतली. त्यांनी मनपा आरोग्य अधिकाऱ्यांना त्वरित चौकशी व कठोर कारवाईचे निर्देश दिले. वरिष्ठांच्या निर्देशानुसार मनपाचे आरोग्य अधिकारी, सीताबर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. संयुक्त चौकशीदरम्यान या शिबिरासाठी कोणतीही आवश्यक प्रशासकीय परवानगी घेण्यात आली नसल्याचे, तसेच तिथे मोठ्या प्रमाणावर संशयास्पद आर्थिक व्यवहार सुरू असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. प्रशासनाने हे शिबिर तत्काळ बंद पाडून तेथील औषधे आणि इतर साहित्याचा साठा जप्त केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *