![]()
नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी आरसीसीचा संचालक प्रा.शिवराज मोटेगावकरला सीबीआयने अटक केल्यानंतर १९ रोजी पुण्यात त्याच्या मुलाचीही सीबीआयने चौकशी केली. मुलापाठोपाठ आता मोटेगावकरच्या पत्नीलाही सीबीआयने चौकशीसाठी पुण्यात बोलावले असल्याची माहिती सूत्रांनी
.
मोटेगावकरने खासगी क्लासच्या माध्यमातून कमावलेल्या रग्गड कमाईची सीबीआयने लातुरात चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी १९ मे रोजी एक पथक नागपूरहून दाखल झाले. यापूर्वीचे पुण्याचे पथक व नागपूरचे अशा दोन्ही पथकांनी आज दिवसभर आरसीसी कार्यालयात आर्थिक व्यवहारांची चौकशी केली. त्यांच्यासोबत बँकेचेही काही अधिकारी होते.
नीट-यूजी २०२६ पेपर लीक प्रकरणात जसजसा तपास पुढे जात आहे, तसतसे नवीन खुलासे होत आहेत. सीबीआयच्या तपासात असे संकेत मिळाले आहेत की, गेल्या वर्षीही नीटचा पेपर परीक्षेपूर्वी लातूरच्या रेणुकाई करिअर सेंटर (आरसीसी) या कोचिंग संस्थेच्या नेटवर्कपर्यंत पोहोचला होता. तपासात कोचिंग संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर याचे पेपर लीक नेटवर्कशी जुने साटेलोटे असल्याचे समोर आले आहे.
भास्करने या कोचिंगमधून नीट-२०२५ मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी केली असता, १९ जणांची देशातील वेगवेगळ्या एम्समध्ये निवड झाल्याचे निष्पन्न झाले. यापैकी २ विद्यार्थी दिल्ली एम्स, ५ हैदराबाद आणि प्रत्येकी ३ विद्यार्थ्यांची भोपाळ व वाराणसी एम्समध्ये निवड झाली आहे. नागपूर, देवघर, गोरखपूर, राजकोट, रायपूर आणि मंगलगिरी एम्समध्ये प्रत्येकी १ विद्यार्थी आहे. या सर्वांची नावे आणि नीट स्कोअरचे रेकॉर्ड भास्करकडे उपलब्ध आहे.
चौथ्या दिवशीही लातुरात सीबीआय पथक मुक्कामी
सीबीआयचे आठ सदस्यांचे विशेष पथक लातुरात ठाण मांडून आहे. मोटेगावकरच्या कार्यालयाची त्यांनी सलग चौथ्या दिवशी झडती सुरू ठेवली. कार्यालयातील कागदपत्रे व आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. बँक अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याने आर्थिक देवाणघेवाणीचा हिशेब तपासत आहेत. त्यामुळे तेथे आज पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.
मोटेगावकरच्या मालमत्तेची ईडीकडून नांदेडात चौकशी
मोटेगावकरने २५ वर्षांत कमावलेल्या रग्गड कमाईच्या चौकशीसाठी नांदेड शहरात १९ मे रोजी रात्री ईडीचे एक पथक हॉटेलात मुक्कामी होते, अशी माहिती दिव्य मराठीला सूत्रांनी दिली.
पुण्यात विद्यार्थी-पालकांकडून घेतली नीट पेपरची माहिती
‘आरसीसी’ क्लासमध्ये शिकणाऱ्या ३ विद्यार्थ्यांची त्यांच्या पालकांसह पुण्यात सीबीआयने चौकशी केली. त्यांच्याकडे परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका कुणी व कशा दिल्या, त्याची माहिती घेण्यात आली.
पेपर सेटर पी.व्ही. कुलकर्णी यांच्या संपर्कात होते डॉक्टर
लातुरातील एक बालरोगतज्ज्ञ व एका स्रीरोगतज्ज्ञाची सीबीआयने चौकशी केली. एकाचा मुलगा व मुलीसाठी मोटेगावकर व पी.व्ही. कुलकर्णी यांनी त्यांना ‘नीट’ पेपर दिल्याचा संशय आहे.
मोटेगावकरच्या बारावीतील मुलाची पुण्यात ८ तास चौकशी
बारावीत असलेल्या मोटेगावकरच्या मुलाची ८ तास चौकशी केली. वकीलही होते. सायंकाळी सोडून देण्यात आले. आता मोटेगावकरच्या पत्नीलाही चौकशीसाठी बोलावले आहे.
खासगी मेडिकल कॉलेजची तयारी
मोटेगावकर हा लातुरात खासगी मेडिकल कॉलेज सुरु करण्याची तयारी करत होता. त्यासाठी आधी मुलाला एमबीबीएस करण्याचे त्याचे स्वप्न होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कॉपीसाठी स्वतंत्र ‘वन-ऑन-वन मेंटरिंग कोर्स’
मोटेगावकरच्या निशाण्यावर असे विद्यार्थी असायचे, जे श्रीमंत असतील. पालकांशी डील झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना रेग्युलर बॅचसोबत बसवले जायचे, पण परीक्षेपूर्वी शेवटचे १५ दिवस त्यांच्यासाठी ‘वन-ऑन-वन मेंटरिंग कोर्स’ चालवला जायचा. पेपर मिळताच प्रत्येक मुलाकडून एक-एक प्रश्न पाठ करून घेतला जायचा. या कोर्सचे अनेक व्हिडिओ सीबीआयने जप्त केले आहेत.
गेल्या वर्षीही लातुरात आला होता नीटचा पेपर
छत्रपती संभाजीनगरात ‘आरसीसी’समोर ठाकरे गट, काँग्रेस, एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी संयुक्त आंदोलन केले. संतप्त कार्यकर्त्यांनी क्लासेसच्या बॅनरची तोडफोड केली. पोलिस व कार्यकर्त्यांत झटापट झाली. पोलिसांनी काँग्रेसच्या दीक्षा पवार, ठाकरे गटाच्या दीपाली पाटील, एसएफआयच्या मनीषा बल्लाळ व अरुण मते यांना ताब्यात घेतले.
मोटेगावकरचा लातुरात सूतमिल रोडवरील ओंकार रेसिडेन्सीमध्ये फ्लॅट आहे. मंगळवारी दुपारी तेथे दिव्य मराठी प्रतिनिधीने पाहणी केली असता या फ्लॅटला कुलूप लागले होते. मोटेगावकरचा नांदेड येथील क्लासचा व्यवस्थापक विवेक पाटील याची सीबीआयने मंगळवारी रात्री चौकशी केली व त्यांना पुणे येथे चौकशीसाठी बोलावले असल्याची माहिती मिळाली. लीक केलेला नीटचा पेपर विद्यार्थी, पालकांपर्यंत पोहोचवण्यात पाटील याचा सहभाग असल्याचा सीबीआयला संशय आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.