![]()
मनमाड आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थिती, वाढते इंधन दर आणि पुरवठा साखळीतील अडचणींमुळे नाशिक जिल्ह्यासह मनमाड-नांदगाव परिसरात डिझेल टंचाईचे संकट गडद होत आहे. अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा पुरवठा मर्यादित झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूकदार, शेतकरी आणि व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. नांदगाव व मनमाड शहरातील काही प्रमुख पेट्रोल पंपांवर सकाळपासूनच डिझेल भरण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी दिसून आली. विशेषतः मालवाहू ट्रक, प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसेस, शेतीसाठी वापरली जाणारी वाहने तसेच जनरेटरवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. अनेक वाहनचालकांना तासन्तास प्रतीक्षा करूनही अपुरा पुरवठा मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. स्थानिक वाहनधारकांच्या म्हणण्यानुसार, डिझेल मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने आधीच रांगेत उभे राहावे लागत आहे. याचा थेट परिणाम वाहतूक व्यवसायावर होत असून, खर्चातही वाढ झाली आहे. बोलठाण परिसरातील पंपावर मंगळवारी सकाळपासूनच इंधन भरण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती . पेट्रोल-डिझेल पंप चालकांच्या म्हणण्यानुसार, कंपन्यांकडे दोन-दोन दिवस आगाऊ पैसे भरूनही इंधनाचा पुरवठा वेळेवर होत नाही. सध्या केवळ १२ हजार लिटर डिझेल आणि ६ हजार लिटर पेट्रोलचा एक टँकर मिळत असून, प्रत्यक्षात मागणी त्याच्या दुप्पट आहे. दरम्यान, कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये तसेच इंधन साठवणूक आणि काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने पथके सक्रिय केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन-दोन दिवस आधी पैसे भरूनही डिझेल वेळेवर मिळत नाही. तिसऱ्या दिवशी फक्त मागणीच्या निम्मे डिझेल मिळते. त्यामुळे वाहनांची वेटिंग वाढत असून, ग्राहकांमध्ये नाराजी निर्माण होत आहे. – अशोक शिंगी, संचालक, पाटील शिंगी, भारत पेट्रोलियम पंप, मनमाड
Source link
मनमाड-नांदगाव परिसरात डिझेलसाठी वाहनांच्या पंपांसमोर लांबच लांब रांगा:मर्यादित पुरवठ्याचा वाहतूकदारांसह शेतकरी आणि व्यावसायिकांना अडचण