Headlines

लग्नातील जुन्या वादातून एकाची हत्या:एक गंभीर जखमी; मोर्शी येथील बावरी बंधूंवर रात्री उशिरा हल्ला




लग्नसमारंभातील जुन्या वैमनस्यातून झालेल्या वादाचे रूपांतर रक्तरंजित घटनेत झाले आहे. मोर्शी येथील राजेंद्रसिंग किसनसिंग बावरी (३२) यांची चाकूहल्ल्यात हत्या करण्यात आली, तर अशोकसिंग उर्फ गोलुसिंग बावरी (३६) गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी रात्री अचलपूर-चांदूर बाजार मार्गावरील बेलज फाट्यावर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोर्शी येथील आठवडी बाजार परिसरात राहणारे राजेंद्रसिंग बावरी यांचे कुटुंब परतवाडा येथे चुलत भावाच्या लग्नासाठी आले होते. मंगळवार, १९ मे रोजी दुपारी वाघामाता परिसरातून वरात जात असताना नाचण्याच्या कारणावरून दोन गटांत किरकोळ वाद झाला. या वादात मोर्शी येथील काही युवकांनी परतवाडा येथील विरुसिंग जयसिंग बावरी (३५) यांच्यावर हल्ला केल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या घटनेनंतर दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता आणि प्रकरण परतवाडा पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले होते. मात्र, दोन्ही गटांनी परस्पर सामंजस्याने वाद मिटल्याचे मान्य केले होते आणि कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. त्यामुळे वाद मिटल्याचे समजले जात होते. विवाह सोहळा आटोपल्यानंतर राजेंद्रसिंग किसनसिंग बावरी आणि अशोकसिंग उर्फ गोलुसिंग बावरी हे दुचाकीने मोर्शीकडे परतत होते. रात्री सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास बेलज फाट्याजवळ परतवाडा येथील काही युवकांनी त्यांची दुचाकी अडवली. त्यांनी राजेंद्रसिंग यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. मदतीसाठी धावलेल्या अशोकसिंग यांनाही मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजेंद्रसिंग बावरी यांचा मृत्यू झाला, तर अशोकसिंग बावरी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरू आहे. आधी वाद मिटल्याचे मान्य करूनही उशिरा रात्री हल्ला झाल्याने पोलिसांनाही काही काळ संभ्रम निर्माण झाला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *