![]()
अमरावती: औषध विक्रेत्यांनी पुकारलेल्या एकदिवसीय बंदमुळे बुधवारी रुग्णांना मोठा फटका बसला. या बंदमुळे काही खासगी रुग्णालयांमधील नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या, तर अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना जीवनावश्यक औषधांसाठी दीड ते दोन किलोमीटरची पायपीट करावी लागली. औषध विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवून दिवसभर जयस्तंभ चौकातील दवा बाजार येथे ठिय्या आंदोलन केले. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्सच्या (AIOCD) आवाहनानुसार हे आंदोलन ऑनलाइन फार्मसी आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या धोरणांविरोधात करण्यात आले. या बंदमध्ये अमरावती शहर आणि जिल्ह्यातील सुमारे २६०० औषध दुकाने सहभागी झाली होती. या कडकडीत बंदमुळे स्थानिक आरोग्य व्यवस्था आणि सर्वसामान्य नागरिकांना थेट परिणाम भोगावा लागला. शहरातील बहुतांश खासगी आणि किरकोळ औषध दुकाने पूर्णपणे बंद असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना आवश्यक औषधे, इंजेक्शन आणि सर्जिकल साहित्य मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. ताप, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांची नियमित औषधे संपलेल्या नागरिकांनाही उन्हातान्हात एका दुकानातून दुसऱ्या दुकानात पायपीट करावी लागली. औषध दुकाने बंद असल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रुग्णांची नेहमीपेक्षा अधिक गर्दी होती. यामुळे तेथील औषध भांडारांवरही ताण आला. जीवनावश्यक औषधे वेळेवर उपलब्ध न झाल्यास रुग्णांना धोका निर्माण होऊ नये यासाठी काही खासगी रुग्णालयांमधील नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. केवळ आपत्कालीन आणि तातडीच्या शस्त्रक्रियाच पार पाडण्यात आल्या, मात्र त्यासाठीही नातेवाईकांना औषधांसाठी धावपळ करावी लागल्याचे पीडीएमसीमधील एका रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितले. या संपाच्या पार्श्वभूमीवर अमरावती डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने दिवसभर जयस्तंभ चौकातील दवा बाजार येथे ठिय्या आंदोलन केले. सकाळी एका रॅलीच्या स्वरूपात औषध विक्रेते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. अध्यक्ष सौरभ मालानी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांना निवेदन दिले. या शिष्टमंडळात झोन अध्यक्ष संजय बोबडे, प्रदेश सदस्य प्रवीण देशमुख, कोषाध्यक्ष तुषार कासट आणि उपाध्यक्ष मनोज डफळे यांचा समावेश होता.
Source link
औषध विक्रेत्यांच्या बंदने रुग्णसेवा विस्कळीत:ऑपरेशन्स पुढे ढकलले, औषधांसाठी रुग्णांची पायपीट, आरोग्य व्यवस्थेवर ताण