Headlines

पुणे महापालिका: 5 दिवसांत 10 टक्के घरांची नोंदणी पूर्ण:राष्ट्रीय जनगणना मोहिमेचा दुसरा टप्पा, 15 जूनपर्यंत प्रक्रिया पूर्ण होणार




पुणे महापालिका हद्दीत राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील घरोघरी कुटुंब नोंदणी मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या पाच दिवसांत महापालिका हद्दीतील सुमारे १० टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, १५ जूनपर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती जनगणना विभागाचे प्रमुख विजय लांडगे यांनी दिली. यावर्षी सुरू झालेल्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात मोबाईल ॲपद्वारे स्वगणना उपक्रम राबवण्यात आला होता. यात पुणे जिल्ह्यातील १ लाख ७३ हजार नागरिकांनी कुटुंब नोंदणी केली, ज्यात पुणे महापालिका क्षेत्रातील सुमारे ५० टक्के नागरिकांचा सहभाग होता. दुसऱ्या टप्प्यातील घरोघरी जाऊन कुटुंब नोंदणी १५ मे पासून सुरू झाली आहे. या मोहिमेसाठी सुमारे १२ हजार प्रगणक (गणक) नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक प्रगणकाला ८०० घरांपर्यंत पोहोचून प्राथमिक माहिती संकलित करणे आणि घरांना क्रमांक देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पुणे शहरात मिळकतकर विभागाच्या आकडेवारीनुसार सुमारे १४ लाख मिळकती आहेत. यामध्ये व्यावसायिक मिळकती वगळता अनधिकृत घरे आणि वसाहतींमधील कुटुंबांची संख्याही लक्षणीय आहे. मोहिमेच्या सुरुवातीच्या अवघ्या पाच दिवसांत १० टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे लांडगे यांनी पुन्हा सांगितले. प्रगणकांना आवश्यक प्रशिक्षण, साहित्य आणि ओळखपत्रे देण्यात आली आहेत. मात्र, काही भागांत ओळखपत्र न मिळणे, अपुरे साहित्य मिळणे किंवा आदेश न मिळण्यासारख्या तक्रारी समोर आल्या होत्या. या तक्रारी तातडीने सोडवण्यात येत असल्याचे लांडगे यांनी स्पष्ट केले. काही ठिकाणी कमी शैक्षणिक पात्रता असलेल्या कर्मचाऱ्यांकडे जनगणनेचे काम सोपवण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. अशा ठिकाणी आवश्यक ते बदल करण्यात आल्याची माहितीही लांडगे यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *