![]()
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ‘जय गणेश रुग्णसेवा अभियान’ अंतर्गत मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, २३ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील नू.म.वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली. या शिबिरात हृदयविकार, किडनी, नेत्रविकार, दंत उपचार, स्त्रीरोग, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, अपंगांना मोफत जयपूर फूट वाटप, रक्त तपासणी, रक्तदान शिबिर, ईएनटी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी उपचार, अस्थिरोग, विविध थेरपी, रेडिओलॉजी, श्रवण आणि स्पीच थेरपी यांसारखे उपचार विनामूल्य उपलब्ध असतील. नागरिकांसाठी नू.म.वि. प्राथमिक शाळा, प्रभात थिएटर समोर, अप्पा बळवंत चौक येथे वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील ९० रुग्णालये व संस्था या शिबिरात सहभागी होणार असून, फिरता दवाखाना उपक्रमाचे उद्घाटनही यावेळी केले जाईल. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग आणि पुणे महानगरपालिकेच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा, याची माहिती अनेक रुग्णांना नसते. अशा रुग्णांना ट्रस्टतर्फे या योजनांचा लाभ मिळवून दिला जातो. तसेच, ज्या रुग्णांकडे आवश्यक कागदपत्रे नसतात, त्यांना नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून कागदपत्रे मिळवून देण्यासाठीही ट्रस्ट तत्परतेने कार्य करते. ‘आरोग्य गणेशा’ अंतर्गत मागील दोन वर्षांत हजारो रुग्णांना विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, तपासण्या, साहित्य व औषधे वाटप यांसारखी सर्वतोपरी मदत करण्यात आली आहे. ट्रस्टच्या एकूण १४ रुग्णवाहिका असून, त्याद्वारे पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात २४ तास विनामूल्य सेवा दिली जाते. महाराष्ट्रात डिझेल खर्चात ही सेवा उपलब्ध आहे. यामध्ये कान, डोळे, दंत तपासणी व्हॅन रुग्णवाहिकेचाही समावेश आहे. नागरिकांनी या सेवांचाही लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
Source link
दगडूशेठ ट्रस्टतर्फे मोफत महाआरोग्य शिबीर:23 मे रोजी नू.म.वि. प्रशालेत, जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत आयोजन