Headlines

वनराज आंदेकरच्या भावावर गोळीबार करणारे 6 जण जेरबंद:पुणे गुन्हे शाखेने लोणावळ्यातून आरोपींना अटक केली




पुणे गुन्हे शाखेने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज सूर्यकांत आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपीच्या भावावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सहा जणांना अटक केली आहे. यात पाच अट्टल गुन्हेगारांसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने ही कारवाई लोणावळ्यातून केली. २० मे २०२६ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास धनकवडी येथील राजर्षी शाहू बँक चौक, बालाजीनगर येथे अक्षय म्हस्के (वय २६) याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. रिक्षात बसलेल्या अक्षयवर दबा धरून बसलेल्या टोळीने पिस्तुलातून गोळीबार करून धारदार शस्त्रांनी वार केले होते, ज्यात तो गंभीर जखमी झाला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-१ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित जाधव आणि त्यांच्या तपास पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. तपासादरम्यान संशयित आरोपी ऋषीप्रसाद आंबट याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले. ऋषीप्रसादच्या वडिलांकडे चौकशी केली असता, तो इतर साथीदारांसह लोणावळ्यात गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाला आरोपी पुणे-मुंबई हायवेवरील बेहेरगाव, कार्ला येथील एकविरा देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कमानीजवळ येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आवेज अशपाक शेख (वय २६, रा. गणेश पेठ, पुणे), अमन फारुख बागवाले (वय २१, रा. भवानी पेठ, पुणे), वेदांत श्रीनिवास टेमगिरे (वय १९, रा. भवानी पेठ, पुणे), ऋषीप्रसाद मोहन आंबट (वय २१, रा. नाना पेठ, पुणे), आफताब शरीफ सय्यद (वय २२, रा. कोंढवा खुर्द, पुणे) यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत असलेल्या एका विधीसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, पुढील तपासासाठी त्यांना सहकारनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही यशस्वी कामगिरी युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित जाधव, युनिट-२ च्या अश्विनी जगताप, पोलीस उपनिरीक्षक राहुल मखरे आणि पोलीस अंमलदार विनोद शिंदे, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, हेमंत पेरणे, अमित जमदाडे, मयुर भोसले, सुहास डोंगरे, निलेश साबळे, युवराज कांबळे, उमेश मठपती व अविनाश दळवी यांच्या पथकाने केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *