![]()
राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत आज, गुरुवारी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात “सर्वांची योजना-सर्वांचा विकास” अंतर्गत “पंचायत विकास आराखडा नियोजन प्रक्रिया या विषयावर राज्यस्तरीय ऑनलाइन व्हर्च्युअल प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत ग्रामपंचायत विकास आराखडा प्रभावीपणे तयार करण्यासाठी आवश्यक विविध बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये ई-ग्राम स्वराज प्रणाली, पंचायत निर्णय ॲप्सचा वापर, ग्रामपंचायत प्रशिक्षण आराखडा, नियोजन प्रक्रिया, पी.ए.आय. संदर्भातील माहिती सहभागी प्रशिक्षणार्थी यांना देण्यात आली. प्रशिक्षण कार्यशाळेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीराम कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) बाळासाहेब बायस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) बाळासाहेब रायबोले, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा) स्नेहा धावडे, सहायक गट विकास अधिकारी मीना मसतकर, सहायक गट विकास अधिकारी सुनील गवई यांच्यासह तज्ज्ञ प्रशिक्षक, राष्ट्रीय ग्रामीण स्वच्छता अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत), अंगणवाडी पर्यवेक्षिका तसेच तालुका व्यवस्थापक उपस्थित होते. कार्यशाळेमध्ये पंचायत स्तरावरील विकास आराखडे अधिक परिणामकारक, लोकसहभागावर आधारित आणि तंत्रज्ञानस्नेही पद्धतीने तयार करण्यावर भर देण्यात आला. तसेच ग्रामपंचायतींनी स्थानिक गरजा व उपलब्ध संसाधनांचा विचार करून सर्वसमावेशक विकास आराखडे तयार करावेत, असेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. याच महिन्यात सरपंच, सदस्यांचे प्रशिक्षण “ग्रामपंचायतींचे विकास आराखडे अधिक दर्जेदार, लोकाभिमुख व परिणामकारक होण्यासाठी याच महिन्यात तालुकास्तरावर सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामपंचायत अधिकारी यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. सर्व संबंधितांनी प्रशिक्षणास पूर्ण वेळ उपस्थित राहून ‘क्वालिटी जीपीडीपी’ तयार करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा.” – सत्यम गांधी , मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अमरावती.
Source link
सर्वांची योजना-सर्वांचा विकास:पंचायत विकास आराखडा नियोजन प्रक्रिया राज्यस्तरीय ऑनलाइन प्रशिक्षण कार्यशाळा