Headlines

विदर्भातील शाळा 15 नव्हे 26 जूनपासून सुरू?:गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले संकेत; सूर्य असाच आग ओकत राहिला तर सरकार निर्णय घेणार




विदर्भात सध्या उष्णतेची लाट सुरू आहे. ही लाट 10 जूननंतर अशीच कायम राहिली तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकार विदर्भातील शाळा 15 जून ऐवजी 26 जूनपासून सुरू करण्यासंबंधी एखादा ठोस निर्णय घेऊ शकते, असे संकेत राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले आहेत. राज्यातील अनेक शहरांवर सध्या सूर्य आग ओकत आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी हे शहर सध्या देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. येथे नुकतेच 47.2 अंश सेल्सिअस एवढे विक्रमी तापमान नोंदवण्यात आले. हवामान खात्याने पुढील 2 दिवस विदर्भात उष्णतेचा तडाखा कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच अकोला, अमरावती व वर्धा या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट, तर नागपूर व यवतमाळ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री पंकज भोयर यांनी विदर्भातील शाळांच्या सुट्ट्यांत वाढ करण्याचे संकेत दिलेत. मंत्री पंकज भोयर याविषयी बोलताना म्हणाले की, तापमानात दिवसेंदिवस सातत्याने वाढ होत आहे. 10 जूननंतरही विदर्भात उष्णतेची लाट सुरू राहिली तर विदर्भात 15 जूनपासून सुरू होणाऱ्या शाळा 26 जूनपासून सुरू करण्यावर सरकार विचार करेल. शालेय शिक्षण विभाग लवकरच या प्रकरणी बैठक घेऊन स्थितीचा आढावा घेणार आहे. या प्रकरणी लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल. नागपूर विद्यापीठाच्या सर्व परीक्षा सकाळच्या सत्रात घेतल्या जातील. तसेच केंद्रांची संख्याही वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल. प्री-प्रायमरी शाळांसाठी कायदा आणणार पंकज भोयर यांनी यावेळी राज्यात प्री-प्रायमरी स्कूल रजिस्ट्रेशन अॅक्ट आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही सांगितले. राज्यातील प्री – प्रायमरी स्कूलचे रजिस्ट्रेशन शासनाकडे झाले पाहिजे. या प्रकरणी कायदा आणण्याची मागणी होत होती. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने तयारी पूर्ण केली आहे. त्याचा मसुदा सध्या मंजुरीसाठी विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला आहे. विधी व न्याय विभागाचा अंतिम अभिप्राय मिळाल्यानंतर आगामी अधिवेशनातच हा प्री-प्रायमरी स्कूल रजिस्ट्रेशन अॅक्ट आणण्याचा सरकारचा प्रयत्न राहील, असे ते म्हणाले. मुंबईत आज पावसाची शक्यता दुसरीकडे, हवामान खात्याने आज मुंबईसह कोकणातील काही भागांत हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबईसह कोकणातील काही भागांत आज हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. खात्याने मुंबई, रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांसाठी यलो वॉर्निंग जारी केली आहे. वातावरणात बदल झाल्यामुळे मुंबई व उपनगरांत सध्या सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे येथे केव्हाही पाऊस होण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *