![]()
बाणेर-बालेवाडी परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी कोथरूड येथील निवासस्थानी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. नागरिकांना गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा मिळावा यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीदरम्यान बाणेर-बालेवाडी भागातील वीजपुरवठा खंडित होण्यामागील कारणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या भागात सुरू असलेले रस्ता रुंदीकरण आणि मेट्रो प्रकल्पाची कामे यामुळे अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तुटण्याच्या घटना घडल्या आहेत. परिणामी, जोडणीच्या ठिकाणी केबल नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. याशिवाय, बाणेर-बालेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर नवीन निवासी व व्यावसायिक प्रकल्प उभे राहत असल्याने विद्युत भारात सातत्याने वाढ होत आहे. मात्र, त्या तुलनेत विद्यमान वीज यंत्रणा अपुरी पडत असल्याचे अधिकाऱ्यांनी पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेऊन बाणेर-बालेवाडी, पाषाण, सूस आदी भागातील वीज वितरण यंत्रणांचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्याचे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिले. या भागासाठी नवीन अतिउच्चदाब उपकेंद्र उभारण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. याबाबत महापारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घेऊन कामाला गती देण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यानच्या काळात नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी अतिउच्चदाब केंद्रातून दोन नवीन फीडर सुरू करण्यासाठी निविदा काढण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ही कामे येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचना पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. वरील कामांमध्ये कोणत्याही स्तरावर अडथळे निर्माण झाल्यास मंत्रालय स्तरावर अथवा महावितरण मुख्यालय स्तरावर स्वतंत्र बैठका घेऊन प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येतील, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. विशेषतः, अत्यावश्यक वीज दुरुस्तीच्या कामांसाठी रस्ते खोदाई परवानग्यांमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत पुणे महापालिका आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन सदर प्रश्न सोडविण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना आश्वासित केले. तसेच, बाणेर-बालेवाडी परिसरातील वीजपुरवठ्याचा नियमित आढावा घेण्यासाठी दरमहा बैठक घेण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. नागरिकांना अखंडित व गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा मिळावा, यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करावे, अशा स्पष्ट सूचना चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
Source link
चंद्रकांत पाटील यांनी महावितरण अधिकाऱ्यांची बैठक घेतली:बाणेर-बालेवाडीतील वीज समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश