![]()
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नदीनाले, गटारी आणि सार्वजनिक परिसरांची तातडीने स्वच्छता करावी, अशा सूचना नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी दिल्या. स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२०२६ अंतर्गत नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाची तातडीची बैठक नगराध्यक्षांच्या दालनात पार पडली, यावेळी ते बोलत होते. मुख्य आरोग्य निरीक्षक वैभव भामरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत प्रभाग क्रमांक १ ते ५ मधील प्रमुख व सुपरवायझर यांना पावसाळ्यापूर्वी व्यापक स्वच्छता अभियान राबविण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष पाटील यांनी विविध प्रभाग प्रमुखांच्या कामाचा आढावा घेत शहरातील काही भागांची प्रत्यक्ष पाहणीही केली. शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी घंटागाडीमार्फत ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्यात यावा. तसेच रस्ते, गटारी, सार्वजनिक शौचालये, मुताऱ्या, धार्मिक स्थळे आणि उद्यान परिसरांची नियमित स्वच्छता करण्याच्या सूचनाही नगराध्यक्ष पाटील यांनी दिल्या. स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगत नागरिकांशी संवाद साधून त्यांचा अभिप्राय घेण्याचे निर्देश देण्यात आले. उघड्यावर अथवा गटारीत कचरा टाकू नये, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. बैठकीत मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी कर्मचाऱ्यांना प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन करत गैरहजर व कामचुकार कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा दिला. यावेळी वाल्मिक अप्पा आंधळे, विलास हुकिरे, मानसी जाधव, मनिषा धांडे, किशोर अहिरे उपस्थित होते. पावसाळ्यापूर्वी नाले व गटारींची साफसफाई, ओला व सुका कचरा वेगळा संकलित करण्यावर भर, सार्वजनिक शौचालये, धार्मिक स्थळे व उद्यानांची नियमित स्वच्छता, नागरिकांचा अभिप्राय घेऊन जनसहभाग वाढविण्याचे निर्देश देण्यात आले. कामचुकार व गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशाराही यावेळी देण्यात आला.
Source link
पावसाळ्यापूर्वी नाले, गटारी स्वच्छ करा:मनमाडला नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना