![]()
अकोला जिल्ह्यातील बोरीगाव मंजू पोलिस ठाण्यात हद्दीत घडलेल्या एका थरारक आणि क्रूर हत्याकांडचा छडा लावण्यात यवतमाळातील अवधुतवाडी पोलिसांना यश आले. अनैतिक संबंधाच्या संशयातून एका 19 वर्षीय तरुणाची दगडाने चेहरा ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी अत्यंत गुप्तता आणि कौशल्याने तपास चक्र फिरवून या प्रकरणातील मुख्य आरोपीला यवतमाळ येथून बेड्या ठोकल्या आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि यवतमाळ परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि.22 मे 2026 रोजी बोरीगाव मंजू हद्दीतील बोदरखेड शेत शिवारात असलेल्या सुभाष यादव यांच्या गोदामासमोरील रेल्वे अंडरपासमध्ये एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाच्या अंगात फक्त पॅन्ट होती, तर अंगातील टी-शर्ट गळ्याभोवती गुंडाळलेला होता. अत्यंत क्रूरतेने मृतकाचा चेहरा दगडाने ठेचून त्याची ओळख मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या पथकातील गोपनीय बातमीदाराकडून एक अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. यवतमाळ येथील एक 19 वर्षांचा तरुण दि. 21 मे 2026च्या रात्रीपासून बेपत्ता असल्याची माहितीसमोर आली. अकोला पोलिसांनी तत्काळ यवतमाळ येथील अवधुतवाडी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. मिळालेल्या वर्णनावरून आणि तपासाअंती, तो मृतदेह विक्की उर्फ बबलु राजू भेंडे (वय 19 वर्षे,रा. गुरुनानक नगर, गोधणी रोड,यवतमाळ) याचाच असल्याचे निष्पन्न झाले. मृतकाची ओळख पटल्यानंतर एलसीबीच्या पथकाने विक्की भेंडे याच्या मित्रांकडे आणि परिसरात चौकशी केली. विक्कीचे त्याच्याच गल्लीत राहणारा शेजारी युवराज तांगडे (वय 41 वर्षे) याच्यासोबत काही दिवसांपूर्वी कडाक्याचे भांडण झालेहोते, अशी खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. संशयाच्या आधारे अकोला पोलिसांनी यवतमाळातील अवधुतवाडी पोलिसांच्या मदतीने युवराज तांगडे याला ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी केली. मृतक विक्की याचे माझ्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा मला संशय होता, याच रागातून मी त्याला गाठून दगडाने चेहरा ठेचून त्याची हत्या केली, अशी धक्कादायक कबुली आरोपी युवराज तांगडे याने दिली. आरोपीला पुढील तपासासाठी बोरीगाव मंजू पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
Source link
यवतमाळमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयातून डोके चिरडले:मृतदेहाची ओळख पटली, पोलिसांनी ठोकल्या आरोपीस बेड्या