Headlines

भगवंताच्या नामस्मरणाने आपल्या जीवनातील अडचणी होतात कमी:राधाकृष्ण महाराज यांचे प्रतिपादन, श्रीमद्भागवत कथेला भाविकांची गर्दी‎




असफल झालेल्या विद्यार्थ्यांना सफल कसे व्हावे याची प्रेरणा भागवत कथेमधून मिळते. विद्या धन प्राप्त करण्यापूर्वी परमात्म्याचे स्मरण आवश्यक असते. दिवसाची सुरुवात भगवंताचे स्मरण करून करावी. आपल्या भारतीय संस्कृतीत भगवंताच्या स्मरणास अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेळ निश्चित करून दररोज भगवंताचे भजन करावे, जीवनातील अडीअडचणी कमी होत चालल्याचे अनुभवास येते. जीवनात यशस्वी होण्याचे आणि आनंद मिळवण्याचे गूज भागवत कथा सांगते, असे प्रतिपादन राधाकृष्णजी महाराज यांनी केले. येथील रामनिवास इंदाणी आणि इंदाणी परिवारातर्फे नवीन टिळक रोडवरील नंदनवन लॉन्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे तृतीय पुष्प गुंफताना ते बोलत होते. व्यासपीठावर हभप भास्करगिरी महाराज होते. महेश इंदानी यांच्या हस्ते भास्करगिरी महाराजांचा तर दिव्या इंदाणी यांच्या हस्ते महापौर ज्योती गाडे यांचा सन्मान करण्यात आला. राधाकृष्ण महाराज म्हणाले, राजा परीक्षित आपल्या प्रपंचाचा आणि राज्य कारभाराचा भार भगवंताकडे सोपवून निरंतर कथा श्रवणाचा आनंद घेत होते. त्यामुळे ते श्रवण भक्तीचे आचार्य आणि आदर्श झाले. राजा असून राज्याचे रक्षण करण्यासाठी त्यांना कधीही युद्ध करावे लागले नाही. अंत:करण निर्मळ असले की भगवंताचा प्रभाव दिसून येतो. चित्तात भजन उतरले की, चिंतामुक्त होण्याचा आनंद मिळतो. सीमेवरील सैनिक भययुक्त नसतो तर भयमुक्त असतो. आपल्या देशातील सैनिक महात्मा पेक्षा कमी नाही, असे त्यांनी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट होत भारत मातेचा उत्स्फूर्त जयघोष उपस्थित भाविकांनी केला.भजनाचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, भक्त मागील दहा पिढ्यांचा आणि पुढील दहा पिढ्यांचा उद्धार करतो हे सत्य आहे. त्यामुळेच आजही संतांची नावे घेतली की, मन प्रसन्न होते. भक्तांशी संबंध जोडला की, मन शाश्वत आनंदाची अनुभूती घेत रहाते. लहानांप्रती स्नेह आणि मोठ्यांबद्दल आदर ठेवावा, जीवन आनंददायी होते. व्यापाऱ्यांना इमानदारीने व्यापार करतानाही अडचणींचा सामना करावा लागतो. हभप भास्करगिरी महाराजांनी भागवत कथा जीवनातील भिती घालवणारी आहे असे सांगितले. कथा श्रवण करण्यासाठी शहराच्या विविध उपनगरातील भाविकांची अलोट गर्दी होऊ लागली आहे. दररोज गर्दीचा उच्चांक होऊ लागल्याचे दिसून येते आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *