Headlines

कासार पिंपळगाव शिवारात भरवस्तीत बिबट्याचे दर्शन:ग्रामस्थांत भीतीचे वातावरण, वनविभागाकडे पिंजरे लावण्याची मागणी‎




तालुक्यातील कासार पिंपळगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर कमालीचा वाढला असून, मानवी वस्तीजवळ बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास वृद्धेश्वर कारखाना ते कासार पिंपळगाव रस्त्यावरील एका दुकानाजवळील पुलाच्या परिसरात पुन्हा बिबट्या आढळून आल्याने नागरिकांची चिंता अधिकच वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने आणखी पिंजरे लावावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कासार पिंपळगाव परिसरात साखर कारखाना, लहान-मोठे उद्योग, महाविद्यालये, शाळा तसेच दाट लोकवस्ती आहे. अशा गजबजलेल्या भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वारंवार दिसून येत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी बिबट्या रस्त्यावर आणि वस्तीजवळ येत असल्याने नागरिकांचे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. बुधवारी मयूर मुनोत यांच्या दुकानाजवळील पुलावर बिबट्या दिसल्याने या भागातील सुरक्षा रामभरोसे असल्याचा सूर उमटत आहे. बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे कासार पिंपळगावच्या सरपंच मोनाली राजळे, ग्रामसेवक प्रमोद म्हस्के आणि आप्पा राजळे यांनी पुढाकार घेत तिसगाव वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत ग्रामपंचायत कार्यालयात तातडीची आढावा बैठक घेतली. गावात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सध्या दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. बिबट्याचा वावर मोठा असल्याने ग्रामपंचायतीने ठराव मंजूर करून वनविभागाकडे तातडीने आणखी एका पिंजऱ्याची मागणी केली आहे. वनविभागाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन तिसगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्याम शिरसाठ यांनी नागरिकांना अत्यंत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी विनाकारण घराबाहेर फिरणे टाळावे, लहान मुलांना अंधारात अजिबात एकटे सोडू नये, शेतकरी बांधवांनी शेतात जाताना समूहाने जावे, हातात काठी आणि टॉर्चचा वापर करावा, दुचाकी अथवा पायी प्रवास करताना पूर्ण खबरदारी घ्यावी, बिबट्या दिसल्यास घाबरून न जाता तातडीने गावातील जबाबदार व्यक्ती किंवा वनविभागाशी संपर्क साधावा. बिबट्याला त्रास देण्याचा किंवा डिवचण्याचा प्रयत्न करू नये. “या’ भागात हायअलर्ट! वनपाल अशोक शर्माळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्याचा वावर प्रामुख्याने ऊस शेती, पाण्याचा फुगवटा असलेला भाग आणि दाट झाडी असलेल्या परिसरात अधिक दिसून येतो. सध्या तिसगाव वनविभागाचे पथक कासार पिंपळगाव परिसरात रात्रं-दिवस गस्त घालत असून नागरिकांमध्ये जनजागृती करत आहे. यापूर्वीही हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव, चितळी, पाडळी या पाटपाण्याच्या पट्ट्यात बिबट्याचा वावर आढळून आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *