Headlines

मंत्री उदय सामंतांच्या पत्नीसाठी अख्खी यंत्रणा कामाला:नेते आता कलाकारांचे क्षेत्रही बळकावणार का? सुषमा अंधारे यांचा सवाल




अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, यावेळची लढत केवळ कलाकारांपुरती मर्यादित न राहता त्यात आता राजकीय ‘हायव्होल्टेज’ ड्रामा सुरू झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत थेट उद्योगमंत्री उदय सामंत आणि त्यांच्या पत्नी नीलम सामंत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मंत्री उदय सामंत यांच्या पत्नीला निवडून आणण्यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याचा दावा अंधारे यांनी केल्याने चित्रपट वर्तुळासह राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. सुषमा अंधारे यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट लिहीत म्हटले आहे की, “मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम उदय सामंत यांची निवड व्हावी यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. विजय पाटकर यांच्यासारख्या अत्यंत ज्येष्ठ अभिनेत्याला सुद्धा अर्ज भरण्यापासून रोखण्यात आल्याची माहिती मिळते आहे, जी अतिशय गंभीर आहे. नेते जोपर्यंत अभिनेत्यांसारखे वावरतात तिथपर्यंत ठीक आहे; पण नेते जर आता अभिनेत्यांचे हक्काचे कलाक्षेत्रही बळकावणार असतील तर हे अत्यंत दुर्दैवी आहे.” विजय पाटकर विरुद्ध मेघराज भोसले वाकयुद्ध विकोपाला या निवडणुकीत यंदा अभिनेते विजय पाटकर विरुद्ध मेघराज भोसले अशी थेट आणि चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, ऐनवेळी आपल्याला उमेदवारी अर्ज भरू दिला नसल्याचा गंभीर आरोप अभिनेते विजय पाटकर यांनी केला. पाटकरांच्या या आरोपानंतर महामंडळाचे माजी अध्यक्ष मेघराज भोसले यांनी त्यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत पलटवार केला. “विजय पाटकर हा चित्रपटसृष्टीला कलंक आहे. तो अभिनयात चांगला आहे, पण लबाडीमध्ये एक नंबर आहे,” अशा शब्दांत भोसले यांनी पाटकरांवर तोफ डागली. निवडणुकीला नवे वळण एकीकडे विजय पाटकर आणि मेघराज भोसले यांच्यातील वैयक्तिक वाद आणि आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहोचले असतानाच, आता सुषमा अंधारे यांनी यात उडी घेतल्याने या निवडणुकीला पूर्णपणे राजकीय वळण मिळाले आहे. महामंडळाच्या निवडणुकीत थेट मंत्र्यांच्या कुटुंबाचा हस्तक्षेप आणि सरकारी यंत्रणेच्या कथित दबावाचा मुद्दा समोर आल्यामुळे आगामी काळात यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *