Headlines

सह्याद्रीच्या कुशीत काजव्यांचा लखलखाट; भंडारदरा परिसरात पर्यटकांची विक्रमी गर्दी:विकेंडला १५ हजारांहून अधिक पर्यटकांची हजेरी; टोलनाक्यावर १ किमी लांब रांगा‎




विजय पोखरकर |अकोले सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यात आणि भंडारदरा धरणाच्या रिंगरोड परिसरात निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या अखेरीस, म्हणजेच २१ मे पासून रात्रीच्या किर्र अंधारात वृक्षवल्लींवर हजारो काजवे चमचम करताना दिसत असून, अधिकृतपणे काजवा महोत्सव सुरू झाला आहे. २३ व २४ मे च्या विकेंडला हा स्वयंप्रकाशित जीवांचा अनोखा उत्सव पाहण्यासाठी राज्यभरातून तब्बल १५ हजारांहून अधिक पर्यटकांनी भंडारदरा परिसरात तोबा गर्दी केली. मात्र, या अलोट गर्दीमुळे वनविभागाच्या नियोजनाचे पुरते वाभाडे निघाले असून पर्यटकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात प्रवेशासाठी वनविभागाने शेंडी आणि भंडारदरा धरण सांडव्याजवळ टोलनाके उभारले आहेत. येथे चारचाकी वाहनासाठी १०० रुपये आणि प्रती व्यक्ती ३० रुपये शुल्क आकारले जाते. विकेंडला आलेल्या वाहनांच्या महापुरामुळे वनविभागाचे प्रवेशशुल्क वसुलीचे नियोजन पूर्णपणे कोलमडून पडले. प्रवेशिका मिळवण्यासाठी पर्यटकांना तब्बल एक-एक किलोमीटर लांब रांगेत ताटकळत राहावे लागले. यामुळे पर्यटकांचा मौल्यवान वेळ आणि इंधन दोन्ही वाया गेले. काजवोत्सवाच्या ओढीने आलेल्या पर्यटकांमुळे भंडारदरा परिसरातील सर्व हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि टेंट कॅम्पिंग ‘हाऊसफुल्ल’ झाले होते. जे पर्यटक ‘अॅडव्हान्स बुकिंग’ न करता आले होते, त्यांचे निवास आणि जेवणाचे अतोनात हाल झाले. दरम्यान, शुक्रवारी या भागात पावसाने हजेरी लावल्यामुळे हवेतील उष्मा कमी झाला आणि वातावरण अल्हाददायक बनले. परिणामी, शनिवारपासून काजव्यांच्या संख्येत वाढ झाली. काजव्याच्या शरीरात ‘ल्युसिफेरिन’ नावाचे नैसर्गिक रसायन असते. त्याचा जेव्हा ऑक्सिजनशी संपर्क येतो, तेव्हा रासायनिक प्रक्रियेतून हा थंड प्रकाश निर्माण होतो. स्थानिक आदिवासी बांधवांच्या मते, परिसरात काजव्यांचे आगमन होणे म्हणजे आगामी ‘मान्सून’चे संकेत मानले जातात. मुतखेल, रतनवाडी, सांम्रद, शिंगणवाडी, उडदावणे, पांजरे, मुरशेत, घाटघर, कोकणकडा, फोफसंडी आणि हरिश्चंद्रगड परिसरातील हिरडा, बेहडा व स्निग्ध झाडांवर हा लखलखाट सर्वाधिक प्रभावी दिसतो. चमचमत्या काजव्यांचे संसार बिघडवू नका पर्यटनाच्या अतिरेकामुळे आणि वाहनांच्या प्रखर हेडलाईट्समुळे या स्वयंप्रकाशित जीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हा अलौकिक वारसा जकण्यासाठी प्रत्येकाने ‘जबाबदार पर्यटक’ बनणे गरजेचे आहे. त्यासाठी खालील नियमांचे पालन करा: जंगलात टॉर्च, मोबाईल फ्लॅश, कॅमेरा फ्लॅश आणि वाहनांचे हेडलाईट पूर्णपणे बंद ठेवा. प्रखर प्रकाशामुळे काजवे लुप्त होतात. शांतता क्षेत्रात डीजे, लाऊडस्पीकर किंवा गाणी वाजवू नका. काजव्यांना हाताने पकडण्याचा किंवा डब्यात भरण्याचा प्रयत्न करू नका. त्यांचे संसार बिघडू देऊ नका. गैरसोय टाळण्यासाठी येण्यापूर्वीच राहण्याची आणि जेवणाची ऑनलाईन व्यवस्था करून या.पुढील विकेंडला होणारी गर्दी लक्षात घेता वनविभागाने टोलनाक्यांवर अतिरिक्त कर्मचारी नेमून योग्य व्यवस्थापन करावे, जेणेकरून पर्यटकांची अडवणूक आणि गैरसोय टळेल. पर्यटकांच्या गर्दीमुळे व्यवस्थेवर ताण ^”शनिवार आणि रविवारी काजवोत्सव पाहण्यासाठी दूरवरून १० ते १५ हजार पर्यटक आले. यामुळे परिसरातील हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सच्या व्यवस्थेवर मोठा ताण पडला. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे वातावरण छान झाले असून पर्यटकांनी कुटुंबासह या लखलखाटाचा आनंद घेतला. -संजय मंडलिक, हॉटेल व्यावसायिक, उडदावणे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *