![]()
देशातील अत्यंत गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज संध्याकाळी आगीच्या एका भीषण घटनेने एकच खळबळ उडाली. विमानतळाच्या ‘टर्मिनल १’ वरील रनवे परिसरात अचानक लागलेल्या आगीमुळे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. आगीमुळे काही वेळातच संपूर्ण परिसरात धूर पसरला. खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळ प्रशासनाने तातडीने सर्व प्रवेशद्वारे (गेट्स) बंद करून हाय-अलर्ट जारी केला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज संध्याकाळच्या सुमारास टर्मिनल १ जवळील रनवे परिसरात अचानक ठिणग्या उडून आगीचा भडका उडाला. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आगीची बातमी समजताच विमानतळावरील इन-हाऊस अग्निशमन यंत्रणा आणि मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. विमानसेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा विमानतळासारख्या अतिसंवेदनशील (हाय-सिक्युरिटी झोन) भागात आगीची घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षेच्या कारणास्तव गेल्या तासाभरापासून विमानतळाचे सर्व गेट्स बंद करण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. तसेच, धावपट्टीच्या जवळच ही आग लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून टर्मिनल 1 वरील काही विमानांची उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात आली आहेत. यामुळे विमानसेवेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. प्रशासनाकडून चौकशीचे आदेश विमानतळ प्रशासनाने या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. आगीचे नेमके उगमस्थान कोठे होते आणि एवढ्या सुरक्षित ठिकाणी शॉर्टसर्किट झालेच कसे, याची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही तांत्रिक चूक आहे की मानवी निष्काळजीपणा, याचा तपास केला जाणार आहे. सुदैवाने, या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची शक्यता आहे. सुरक्षेवर प्रश्नचिन्ह? आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळावर जिथे चोवीस तास कडक सुरक्षा आणि देखरेख असते, तिथे अशा प्रकारे आग लागल्याने सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी फायर ऑडिट आणि तांत्रिक तपासणी अधिक कडक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Source link
मुंबई विमानतळाच्या 'टर्मिनल 1' वर आग:रनवे परिसरात धुराचे लोट; हाय-अलर्टनंतर सर्व गेट्स बंद, प्रवाशांमध्ये घबराट