Headlines

क्या रे जॉनी, म्हणत टपली मारली अन् तरुणाचा जीव गेला:नागपुरात क्षुल्लक कारणातून खून; किरकोळ वादाचा रक्तरंजित शेवट




नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाने भीषण वळण घेत एका तरुणाचा जीव गेला आहे. कावरापेठ परिसरात भररस्त्यात झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संपूर्ण घटनेचा थरार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेनंतर उमरेड शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने मुख्य आरोपीला अटक केली आहे. मृत तरुणाचे नाव राजकुमार पवार असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला राजकुमार यांचा आरोपी सोहेल ऊर्फ जॉनी शेख यांच्या मित्रासोबत किरकोळ वाद झाला होता. मित्रासोबत भांडण सुरू असल्याची माहिती मिळताच सोहेल शेख दुचाकीवरून घटनास्थळी पोहोचला. त्यावेळी परिसरात वादाचे वातावरण निर्माण झाले होते. या दरम्यान दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमक सुरू असतानाच अचानक परिस्थिती चिघळली. वाद सुरू असताना राजकुमार पवार यांनी क्या रे जॉनी… असे म्हणत सोहेलच्या डोक्यावर टपली मारली. सार्वजनिक ठिकाणी झालेल्या या प्रकारामुळे सोहेल संतापला. रागाच्या भरात त्याने कमरेला लपवून ठेवलेला चाकू बाहेर काढला आणि राजकुमार यांच्यावर थेट हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. उपस्थित लोक काही समजून घेण्याआधीच आरोपीने वार करून घटनास्थळावरून पळ काढला. चाकूचा गंभीर वार झाल्यानंतरही राजकुमार काही वेळ दुचाकीला धरून उभे होते. त्यानंतर त्यांनी एका व्यक्तीच्या मदतीने रुग्णालय गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र, चाकू पोटात खोलवर घुसल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला होता. गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे राजकुमार यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आणखी काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता घटनेनंतर उमरेड पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी सोहेल ऊर्फ जॉनी शेख याला अटक केली. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात या वादात आरोपीचे काही मित्रही सहभागी असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. सध्या उमरेड पोलिस या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *