![]()
पुणे शहर आणि परिसरात आयोजित संयम ऑलिंपियाड या स्पर्धेत कात्रज येथील हुजुरपागा प्राथमिक विद्यालयाने अव्वल क्रमांक पटकावला आहे. कृतीयुक्त शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनविरोधी जनजागृती करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. या स्पर्धेत अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स, शनिवार पेठ, आणि बी.के.कामठे हायस्कूल, येवलेवाडी, यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. वॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन, ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट आणि परिवर्तन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नोव्हेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत संयम ऑलिंपियाडचे आयोजन करण्यात आले होते. पुणे शहर आणि परिसरातील विविध व्यवस्थापनांच्या २६२ शाळांतील ९ हजार २८० विद्यार्थ्यांनी यात सक्रिय सहभाग नोंदवला. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या व्यसनांचे दुष्परिणाम आणि त्यापासून दूर कसे राहायचे, हे समजून घेतले. तसेच, पथनाट्य, भित्तीपत्रके, समूहगीत, प्रभातफेरी, घोषवाक्य आणि लघुनाटिका अशा विविध उपक्रमांतून त्यांनी व्यसनविरोधी जनजागृती केली. कृती आधारित गुणांकनानंतर ६८ शाळा अंतिम परीक्षेसाठी पात्र ठरल्या. मार्च महिन्यात शाळास्तरावर ही परीक्षा पार पडली, ज्याचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. विद्यार्थी गटातून ओम संदीप दळवी (ज्ञानदा प्रशाला, किरकटवाडी) याने प्रथम, सार्थक मुकेश सकपाळ (स्व.तु.गो.गोसावी विद्यालय) याने द्वितीय, तर संस्कृती रामदास मोहोळकर (अहिल्यादेवी हायस्कूल) हिने तृतीय क्रमांक पटकावला. मार्गदर्शक गटातून शिक्षिका प्रिया गोगावले यांनी प्रथम, स्नेहल अनिल गुंजाळ यांनी द्वितीय, तर दिनकर नामदेव साबळे यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. वॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच विजेत्या विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.
Source link
संयम ऑलिंपियाडमध्ये हुजुरपागा प्राथमिक विद्यालय अव्वल:२६२ शाळांतील ९ हजार २८० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग