Headlines

सुधाकर भारसाकळे शिवसेना शिंदे गटात जाणार, काँग्रेसला धक्का:संवाद मेळाव्यात मन मोकळे करत भूमिका स्पष्ट




अमरावती जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील प्रभावी नेते आणि काँग्रेस पक्षाचे सदस्य सुधाकर पाटील भारसाकळे यांनी अखेर मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. त्यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. मंगळवार, २६ मे रोजी दर्यापूर शहरातील माहेश्वरी भवन येथे आयोजित संवाद मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. काही दिवसांपूर्वीच भारसाकळे यांनी दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, ज्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत अनेक चर्चांना उधाण आले होते. अखेर समर्थकांच्या या मेळाव्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या मेळाव्याला मोठ्या संख्येने समर्थक, कार्यकर्ते आणि विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्यात उपस्थित समर्थकांनी “सुधाकर पाटील भारसाकळे आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी अनेकांनी भारसाकळे यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देत आपण कायम त्यांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही दिली. भारसाकळे यांनी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझी वारंवार गोची करण्यात आली आणि मला विश्वासात घेतले नाही, त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. आगामी काळात जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक ताकदीने काम करण्यासाठी आपण शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अंजनगाव-दर्यापूर तालुक्यातील अनेक गावांमधून मोठ्या प्रमाणावर समर्थक या मेळाव्यासाठी दाखल झाले होते. कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघांचे संचालक तसेच नगरपालिकांचे नगरसेवक यांनीही व्यासपीठावर उपस्थित राहून सुधाकर पाटील भारसाकळे यांना पाठिंबा जाहीर केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाचाही भारसाकळे यांनी उल्लेख केला. राज्याच्या सत्ताधारी राजकारणात सक्षम आणि खंबीर नेतृत्वाची गरज असल्याचे मत अनेक वक्त्यांनी व्यक्त केले. भारसाकळे यांचा हा निर्णय काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. सहकार क्षेत्रातील त्यांची मजबूत पकड, ग्रामीण भागातील जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांमधील प्रभाव यामुळे दर्यापूर आणि परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी निवडणुकांमध्ये या निर्णयाचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *