![]()
शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांचे सत्र रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या ‘नो एन्ट्री’च्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या अवजड वाहनांविरुद्ध उपप्रादेशिक परिवहन विभागाने मोठी मोहीम उघडली आहे. २०२६ च्या पहिल्या ५ महिन्यांतच तब्बल १,३१७ अवजड वाहनांवर दंडात्मक कारवाई केली असून, त्यांच्याकडून ३७ लाख ९५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तरीही शहरातील रस्त्यांवर अवजड वाहनांमुळे कोंडी झाल्याचे चित्र अजूनही कायम आहे. अहिल्यानगर शहरात सकाळी ६ ते मध्यरात्री १२ या वेळेत अवजड वाहनांना प्रवेशबंदी आहे. मात्र, अनेक वाहनचालक या अधिसूचनेकडे दुर्लक्ष करून शहरात वाहने घुसवतात. यामुळे नगर-पुणे, नगर-छत्रपती संभाजीनगर आणि नगर-मनमाड या महामार्गांवर प्रचंड कोंडी निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर आरटीओच्या ३ विशेष भरारी पथकांनी शहरातील प्रमुख प्रवेशद्वारांवर नाकाबंदी करून कारवाई केली आहे. शहरातील सुरक्षिततेसाठी अवजड वाहनांच्या वेळांचे पालन करणे अनिवार्य आहे. नियम मोडणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्याच्या कलम ११५ आणि १९४ नुसार कठोर कारवाई सुरूच राहील, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अहिल्यानगर यांनी म्हटले आहे. एकीकडे कारवाई सुरु असली तरी आरटीओ व वाहतूक शाखेतील समन्वयाअभावी शहरात अवजड वाहने बिनबोभाट वावरत असल्याचे दिसते. नो-एंट्रीची वेळ व ठिकाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी अवजड वाहनांना (उदा. हायवा, वाळूचे ट्रक, मोठे कंटेनर) शहरात प्रवेशबंदी आहे. मनमाड रोडवर विळद बायपास चौक, पुणे रोडवर केडगाव बायपास चौक व छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शेंडी बायपास चौकात वाहतूक शाखा पोलिस तैनात आहेत. नियम कागदावर, कोंडी रस्त्यावर! केडगाव, शेंडी, नेप्ती बायपास आणि सोलापूर हायवे चेकनाक्यांवर पोलिसांचा बंदोबस्त असूनही अवजड वाहने शहरात बिनधास्त घुसत आहेत. महामार्ग पोलिसांसह वाहतूक पोलिसांच्या कानाडोळ्यामुळे शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. म्हणून आरटीओची दंडात्मक कारवाई नावापुरतीच दिसत आहे.
Source link
कारवाईचा बडगा, तरीही अवजड वाहनांचा सुळसुळाट!:अहिल्यानगर आरटीओने 5 महिन्यांमध्ये वसूल केला 39 लाख 95 हजार रुपयांचा दंड वसूल