![]()
हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील एमआरआय विभागात रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वेगवेळ्या तीन ठिकाणचा एमआरआय करावा लागत असल्याचे सांगत 6400 रुपये घेण्यात आले आहे. या प्रकाराची चौकशी करून संबंधित संस्थेचा परवाना रद्द करण्याची मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे. याबाबत माहिती अशी की, हिंगोली येथील रहिवासी वसंत यांनी त्यांची पत्नी सुवर्णा वाघ यांना बुधवारी ता. 27 एमआरआय करण्यासाठी शासकीय रुग्णालयात आणले होते. यावेळी वाघ यांनी सकाळी 9:30 वाजता एमआरआय कक्षात विचारणा केली असता, त्यांना प्रथम 1700 रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यावरून वाघ यांनी सदर रक्कमेचा भरणा केला. मात्र काही वेळातच या कक्षातील डॉक्टरांनी रुग्णाच्या शरीराच्या दोन-तीन ठिकाणचा एमआरआय करावा लागेल असे सांगून पुन्हा 2150 रुपयांची मागणी केली सदर रक्कम देखील वाघ यांनी दिली. त्यानंतर एमआरआय सुरु असतांना अर्ध्या तासानंतर संबंधित डॉक्टरांनी तीन ठिकाणच्या एमआरआयसाठी एकूण 6400 रुपये लागतील असे सांगितले. दरम्यान, वारंवार होणाऱ्या या पैशांच्या मागणीमुळे आपली आर्थिक पिळवणूक होत असल्याचा संशय वाघ यांना आला. त्यांनी डॉक्टरांकडून होणारी मागणी संशयास्पद वाटल्याने ही बाब तातडीने रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. रुग्णालय प्रशासनातील वरिष्ठ डॉक्टरांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत एमआरआय करणाऱ्या डॉक्टरांना रुग्णाचे पैसे परत करून विनामूल्य एमआरआय करण्याच्या सूचना दिल्या त्यानंतर वाघ यांना त्यांचे पैसे परत देण्यात आले. या प्रकारामुळे गरजू रुग्णांची आर्थिक लुट होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. यावरून वसंत वाघ यांनी संबंधित संस्थेच्या माध्यमातून अनेक गरीब रुग्णांची अशाच प्रकारे पिळवणूक होत असल्याची शक्यता निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून एमआरआयचे कंत्राट दिलेल्या संस्थेचे कंत्राट रद्द करून त्यांचा परवाना रद्द करावा अशी मागणी केली आहे. आरोग्य विभागाच्या आयुक्तांकडे तक्रार पाठविणार शासकीय वैद्यकिय महाविद्यालय हिंगोली अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल म्हणाले की, एमआरआय सेंटरचा करार आरोग्य विभागाच्या आयुक्त कार्यालयाकडून झाला आहे. त्यांनी किती रुपये शुल्क घ्यावे हे सांगणे कठीण आहे. मात्र वैद्यकिय महाविद्या्लय व रुग्णालयातील रुग्णांना हि तपासणी मोफत आहे. एमआरआय संदर्भात तक्रारी वाढ असून या संदर्भातील तक्रारी आयुक्त कार्यालयाकडे पुढील कारवाईसाठी पाठविणार आहे.
Source link
हिंगोली शासकीय रुग्णालयात एमआरआयच्या नावाखाली रुग्णाची लूट:रुग्णांच्या संतप्त नातेवाईकाची प्रशासनाकडे तक्रार, रुग्णालय प्रशासनाने हस्तक्षेप करताच डॉक्टरांनी पैसे परत केले